Maharashtra Politics: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी निकाल येऊ शकतो. भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी याबाबत संकेत दिले आहेत. याबाबत आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून निकाल आमच्याच बाजूने येईल, असा दावा केला जात आहे. याशिवाय महाविकास आघाडी तसेच भाजपच्या नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावर सूचक विधान केले आहे.
मीडियाशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, माझे स्पष्ट आहे की १६ आमदारांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उलंघन केले आहे. तर कायद्यानुसार हे आमदार निलंबित होतील. तसेच या सत्रामध्ये त्यांना मंत्री देखील होता येणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
PM मोदींना मुख्यमंत्री म्हणून शिंदे की अजून कोण हवेत? याचा निकालही लागेल
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, दोन शक्यता आहेत. एक तर एकनाथ शिंदे यांना कायम ठेवण्यात येईल. पक्षांतराबद्दलचा निकाल अध्यक्षांकडे सोपला जाईल. त्यामुळे शिंदे स्थिर राहतील. दुसरी शक्यता पक्षांतर बंदी कायद्याचे उलंघन केल्यामुळे शिंदे यांना निलंबित करण्यात येईल. त्यामुळे उद्या राजकीय निर्णय येणार. पाच न्यायधीशांचे वेगळे मत असू शकते, असे सांगतानाच यानंतर राजकीय निर्णय येणार आहे. पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री म्हणून शिंदे की अजून कोण हवे? याचा निकाल लागणार आहे, असे सूचक विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
दरम्यान, एकनाथ शिंदे अपात्र ठरले आणि भाजपचा मुख्यमंत्री निवडण्याची वेळ आली तर देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली जाईल का, हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल. कारण भाजपमध्ये अन्य ज्येष्ठ नेते आहेत. अन्य चेहरा दिला जाणार का किंवा भाजपचा तसा प्रयत्न असणार का, हेही काही दिवसांत समजेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.