Prithviraj Chavan On Maratha Reservation: मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचे अल्टिमेटम देण्यात आले आहे. ओबीसींमधून आरक्षण देण्याला जोरदार विरोध होत असून, मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यातच आता आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, सरकार पडले आणि पुढे आरक्षण टिकू शकले नाही, असा मोठा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
मी जुलै २०१४ मध्ये मराठा समाजाला १४ टक्के आरक्षण दिले होते. मात्र, त्यानंतर आलेल्या नव्या सरकारला हे आरक्षण टिकवता आले नाही. मी ज्या फॉर्मुल्याने मराठा आरक्षण दिले त्याच फॉर्मुल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल. आरक्षणाच्या मुद्द्यावर होत असलेल्या राजकारणाबाबत मला कोणी काय आरोप केला याविषयी बोलायचे नाही. परंतु, स्वातंत्र्यानंतर आरक्षणाविषयी पहिल्यांदा मी प्रश्न हाती घेतला होता. कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षणाचा प्रश्न हाताळला, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा आरक्षणाबाबत निव्वळ फसवणूक
आम्ही न्यायालयाची सब कमिटी नेमली होती. मराठा समाजाला क्रिमिलियरची अट टाकून २०१४ मध्ये १६ टक्के आरक्षण दिले. मुस्लिमांच्या मागासलेल्या लोकांना अशा ५० जाती शोधून ५ टक्के आरक्षण त्याकाळी दिले होते. आमचे सरकार पाडण्यात आले आणि हे आरक्षण टिकू शकल नाही, असा दावा करत, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत १६ टक्केच्या ऐवजी १२ टक्के आरक्षण द्यायचा प्रयत्न केला. मात्र ती निव्वळ फसवणूक होती. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी सरकारने काळजी घ्यायची गरज आहे, या शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले.
दरम्यान, यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण करून राज्याच्या समाजकारणाची राजकारणाची घडी बसवली होती. त्याचा अभ्यास इतर राज्यांकडून केला जायचा. मात्र दुर्दैवाने हे चित्र आता राहिले नाही. नेत्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर येऊन एकदा आत्मक्लेश करू नये. तर रोज सकाळ-सायंकाळ येऊन आत्मक्लेश करावा, असा खोचक टोला चव्हाण यांनी लगावला. धनगर समाजाला १५ दिवसांत आरक्षण देतो, असे फडणवीस म्हणाले होते. त्यावर आता तेच बोलतील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.