राहुल गांधी ‘मातोश्री’वर जाणार? लवकरच उद्धव ठाकरेंना भेटण्याची शक्यता; चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 10:42 AM2023-04-14T10:42:38+5:302023-04-14T10:43:25+5:30

Rahul Gandhi To Meet Uddhav Thackeray: सावरकर वादावरुन नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

congress leader rahul gandhi likely meet uddhav thackeray at matoshree soon | राहुल गांधी ‘मातोश्री’वर जाणार? लवकरच उद्धव ठाकरेंना भेटण्याची शक्यता; चर्चांना उधाण

राहुल गांधी ‘मातोश्री’वर जाणार? लवकरच उद्धव ठाकरेंना भेटण्याची शक्यता; चर्चांना उधाण

googlenewsNext

Rahul Gandhi To Meet Uddhav Thackeray:राहुल गांधी यांनी केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपमानावरून महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिंदे गटानेही यावर आक्रमक भूमिका घेतली. यातच आता सावरकर वादानंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर विरोधी पक्षाची आघाडी मजबूत असून आम्ही भाजपविरोधात एकत्रितपणे लढणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच इतर राजकीय पक्षांशी संपर्क करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. दिल्लीतील या राजकीय घडामोडीनंतर आता राहुल गांधी हे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून भेटीला अत्याधिक महत्त्व

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. राहुल गांधी लवकरच उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर येऊन भेटणार असल्याचे म्हटले जात आहे. तसे झाल्यास मातोश्रीवर येणारे गांधी कुटुंबातील राहुल गांधी हे पहिलेच नेते ठरणार असल्याचे बोलले जात आहे. या भेटीदरम्यान सावरकर वाद आणि लोकसभा निवडणुकीवर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच भेट असणार आहे. सावरकर वादानंतर काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  

सावरकर मुद्द्यावरून महाविकास आघाडीत मतभेद

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्या भूमिकेमुळे तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. विशेषतः ठाकरे गट नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली होती. यातच आता राहुल गांधी आता थेट मातोश्रीवर येणार असल्याने या भेटीतून काँग्रेस आणि ठाकरे गटात कोणताही बेबनाव नसल्याचे दाखवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मुंबईत येणार आहेत. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीसंदर्भात चर्चा होणार आहे. याचवेळी भेटीची तारीखही निश्चित केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: congress leader rahul gandhi likely meet uddhav thackeray at matoshree soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.