खामगाव:
‘पर्णपाचू सावळा सावळा, विठ्ठल माझा मळा, मी वारकरी आगळा’ या अभंगाच्या ओळींचा प्रत्यय देत, काँग्रेस नेते तथा खा. राहुल गांधी शुक्रवारी सकाळी १०:४५ वाजता (वरखेड फाटा) विदर्भ पंढरी शेगाव येथे पाऊली खेळले. हजारो वारकºयांच्या उपस्थितीत टाळ-मृदूंगाच्या गजरात खा. राहुल गांधी यांनी ‘विठू नामा’चा जप केला. ‘गण गण गणांत बोतें’चा जय घोष होताच, अवघी शेगाव नगरी भक्तीमय वातावरणात न्हावून निघाली.
भारतीय संविधान वाचविण्यासोबतच लोकशाहीचे संवर्धन करण्यासाठी काँग्रेसनेते तथा माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचे नातू खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत तीन हजार ५७० किलोमीटर पर्यंत भारत जोडो पद यात्रेस प्रारंभ करण्यात आला आहे. पश्चिम विदर्भातील वाशिम, अकोला जिल्ह्यातून या पदयात्रेचे बाळापूर मार्गे शेगावात आगमन झाले. शेगाव- बाळापूर रोडवरील वरखेड फाट्यावर उभारण्यात आलेल्या २१ फुटी परमात्मा पांडुरंग भगवान (श्री विठ्ठलाच्या ) मूर्ती भोवती एक हजार वारकºयांच्या सहभागात पाऊली खेळले. खा. राहुल गांधी श्री गजानन आणि विठ्ठल भक्तीत रममान झाल्याचा भक्तीचा ऐतिहासिक आणि अनुपम्य सोहळा उपस्थितांनी याची देही, याची डोळा हृदयाच्या गाभाºयात साठविला. ‘विठ्ठल माझा...माझा आणि मी विठ्ठलाचा’, ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ या अंभगाच्या ओळी कानावर पडताच अवघी विदर्भ पंढरी भक्तीमय वातावरणात तल्लीन झाली होती. माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचा नातू भक्तीत तल्लीन झाल्याचा प्रसंग पाहताच, वारकरी आणि उपस्थितांच्या डोळ्यातून आपाओप अश्रृ तरळले.
११ अभंगांवर खेळली पाऊली..!- काँग्रेस नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या संकल्पनेतून वरखेड फाट्यावर पाऊलीचा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी वारकºयांनी ११ अभंगांवर पाऊली खेळत ‘भारत जोडो पदयात्रे’त श्रध्दा आणि भक्तीचा रंग भरला. खा. राहुल गांधी यांनीही यावेळी वारकरी, वारकरी संप्रदायाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर वारकºयांनी खा. राहुल गांधी यांना भगवान विठ्ठल, विदर्भ पंढरीनाथ श्री गजानन महाराजांची प्रतिमा भेट देऊन यथोचित स्वागत केले.