मुंबई : विधानसभा निवडणुकीत चर्चेत आलेल्या वंचित बहुजन आघाडीतील दोन माजी आमदारांसह 45 पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. तर यावरूनच काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकीत आंबेडकर यांनी जनतेची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.
सावंत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, प्रकाश आंबेडकर यांनी जर विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सरकार यावे या इच्छेने आडमुठी भूमिका घेतली नसती, तर आज अनेक मंत्री वंचित बहुजन आघाडीतर्फे मंत्रिमंडळात असते. तसेच आंबेडकर यांनी जनतेची व आपल्या कार्यकर्त्यांची केवळ फसवणूकच नाही, तर प्रचंड राजकीय नुकसानही केले आहे. पदाधिकाऱ्यांची घोर निराशा 'त्या' भावनेचे निदर्शक असल्याचंही सावंत म्हणाले.
एकाचवेळी वंचित बहुजन आघाडीतील प्रमुख 45 नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा आणि पक्षाचा राजीनामा दिल्याने प्रकाश आंबेडकरांसाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे राजीनामा देणाऱ्यांमध्ये प्रमुख नेते असलेले अकोल्यातील माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांचा समावेश आहे.