राज्य मंत्रिमंडळाचा गेल्या महिन्याभरापेक्षा अधिक दिवसांपासून रखडलेला विस्तार मंगळवारी सकाळी पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. सध्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही महिला आमदाराला संधी देण्यात आली नाही. विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्य ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु मंत्रिमंडळाच्या विस्तारादरम्यान काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी जोरदार टीका केली.
“आज राज्यपालांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. अडीच वर्षांनंतर त्यांना अशा प्रफुल्ल मनस्थितीत आम्ही पाहत आहोत. भाजपनेच उडवलेला चिखल साफ धुण्याचे तंत्रज्ञान असलेली वॉशिंग मशीन भाजपकडेच आहे, हे आजच्या मंत्रिमंडळ विस्तारातही स्पष्ट झाले. विजयकुमार गावित, संजय राठोड यांच्यावर भाजपानेच आरोप केले होते,” असं म्हणत सचिन सावंत यांनी शिंदे भाजप सरकारवर हल्लाबोल केला.
७२ तासांत मंत्री होणाऱ्यांना आता मुहूर्त मिळाला. त्यामुळे आता तरी कुडमुड्या ज्योतिषाचा व्यवसाय सोडून चंद्रकांत दादा पाटील विज्ञानवादी दृष्टीने व अब्दुल सत्तार हिंदूत्वाच्या उद्धारासाठी समर्पित होऊन काम करतील ही अपेक्षा व शुभेच्छा, असंही ते म्हणाले.