...तर शिवसेना नक्कीच गोत्यात येईल; औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्याचा इशारा
By जयदीप दाभोळकर | Published: January 2, 2021 06:24 PM2021-01-02T18:24:48+5:302021-01-02T18:30:32+5:30
यापूर्वी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीदेखील नामांतराला केला होता विरोध
सध्या औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राजकारणानं जोर धरला आहे. एकीकडे भाजपानं औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर व्हावं अशी मागणी लावून धरली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमधून या नामांतराला विरोध करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. तसंच त्यांनी कॉमन मिनिमम प्रोग्रामची आठवणही करून दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी नामांतरावरून शिवसेनेला इशारा दिला आहे.
"औरंगाबादचं नामांतर हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. परंतु हे तीन पक्षांचं सरकार आहे हे शिवसेनेनं विसरू नये. आघाडीचं सरकार कॉमन मिनिमम प्रॉग्रामच्या माध्यमातून चालतात. कोणाच्याही वैयक्तिक अजेंड्यावर नाही. कॉमन मिनिमम प्रोग्राम हा काम करण्यासाठी आहे नावं बदलण्यासाठी नाही," असं संजय निरूपम म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर भाष्य केलं.
औरंगाबाद का नामांतरण शिवसेना का अपनी पुराना एजेंडा है।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) January 2, 2021
लेकिन सरकार तीन पार्टियों की है, यह नहीं भूलना चाहिए।
गठबंधन की सरकारें कॉमन मिनिमम प्रोग्राम से चलती हैं।
किसी के पर्सनल एजेंडे से नहीं।
प्रोग्राम काम करने के लिए बना है,नाम बदलने के लिए नहीं।#Aurangabad
"औरंगजेबचं व्यक्तीत्व वादग्रस्त राहिलं आहे. त्याच्या प्रत्येक बाबींशी काँग्रेस सहमत असेल हे आवश्यक नाही. छत्रपती संभाजी महाराज हे एक महान योद्धा होते. त्यांचं जीवनकार्य वंदनीय आहे. यावर कोणताही मतभेद नाही. परंतु सरकार चालवताना शिवसेना महापुरुषांना मध्ये आणत राहिली तर नक्कीच गोत्यात येईल. त्यांनी स्वत:च ठरवावं," असंही ते म्हणाले.
यापूर्वी थोरातांकडूनही विरोध
महाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, पण नामांतराला आमचा विरोध राहिल, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितलंय. महाविकास आघाडीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल. पण अद्याप तसा कोणताही प्रस्ताव समोर नसल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलंय. आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याच आधारावर तयार झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब ठाकरेंनी ठामपणे सांगितलं होतं.