"...म्हणून अंत्यसंस्काराला उपस्थित नव्हतो"; काँग्रेस नेत्यांकडून मंगेशकर कुटुंबीयांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 11:46 AM2022-02-08T11:46:57+5:302022-02-08T11:47:39+5:30
लतादीदी या काँग्रेस परिवारातीलच होत्या. त्यांचे योगदान खूप मोठे आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी नेत्यांनी सोमवारी ‘प्रभुकुंज’ येथे जाऊन मंगेशकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन तसेच अंत्यसंस्कारासाठी काँग्रेस नेत्यांच्या अनुपस्थितीवरून सोशल मीडियात प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, आमचे बरेच नेते कोरोनाबाधित असल्याने हजर राहिले नाहीत. तर, मी स्वतः नातेवाईकाच्या मृत्यूमुळे येऊ शकलो नाही, असा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केला.
पटोले म्हणाले की, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख हे सर्वजण कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे ते रविवारी लतादीदींच्या अंत्यदर्शनाच्या ठिकाणी हजर राहू शकले नाहीत. मंत्री अस्लम शेख, वर्षा गायकवाड हे नेते मुंबईबाहेर होते. शनिवार-रविवारमुळे अनेकांचे दौरे होते. अनेकांना कनेक्टिव्हिटी नव्हती, त्यामुळे आम्ही पोहोचू शकलो नाही. तर माझ्या बहिणीच्या सासूसुद्धा वारल्यामुळे मी तिकडे होतो. मात्र, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप तिथे उपस्थित होते, असे पटोले यांनी सांगितले. लतादीदी या काँग्रेस परिवारातीलच होत्या. त्यांचे योगदान खूप मोठे आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी नेत्यांनी सोमवारी ‘प्रभुकुंज’ येथे जाऊन मंगेशकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.