Winter Session Of Maharashtra Assembly 2023: ०७ डिसेंबरपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण यासह अवकाळी पावसामुळे झालेले शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान, राज्यातील कायदा-सुव्यवस्था अशा अनेकविध विषयांवरून हे हिवाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. यातच आता विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेत स्पष्ट केली आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिवेशनासंदर्भात रणनीति आखण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील अन्य नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत विरोधकांनी भूमिका स्पष्ट केली.
...म्हणून आम्ही चहापानाला बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला
विदर्भात अधिवेशन होत असताना विदर्भाचा सुपूत्र म्हणून आपल्या सर्वांच्या प्रश्नांना न्याय देईन. महिला, सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिवेशनात प्रयत्न करेन. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे मिळावे, या राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था सुधारावी, आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. परंतु, या कोणत्याही विषयावर चर्चा होत नाही. यासाठी राज्यापुढील प्रश्न मोठे असताना चहापानाला जाणे उचित नाही, म्हणून आम्ही चहापानाला बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
सरकारचे प्रश्न मोठे आहेत, परंतु अधिवेशाचा कालावधी कमी आहे
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. गरिबी, बेरोजगारीमुळे राज्यात जगणे कठीण झाले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना सरकार शासन आपल्या दारी मोठा इव्हेंट होताना दिसत आहे. बीडमध्ये दुष्काळ, पाणीटंचाई, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबडरे मोडले असताना करोडो रुपये खर्च करून शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवत आहे. इव्हेंट करून बॅनर, हार तुरे लावले, याची लाजतरी वाटली पाहिजे. शेतकऱ्यांप्रती कणव नाही, हे यातून दिसून आलेले आहे. सरकारचे प्रश्न मोठे आहेत, परंतु अधिवेशाचा कालावधी कमी आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
दरम्यान, नागपुरात अधिवेशन होते आहे, या उपराजधानीत कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. नागपूरची ओळख चोरांची नगरी म्हणून झाली आहे. याचा अर्थ या राज्याची सरकार सत्तेत आल्यापासून राज्यामध्ये शांतता भंग मोठ्या प्रमाणात होत आहे, असे दिसते. महाराष्ट्राची ही ओळख असेल तर राज्यात गुंतवणूक कशी येईल, अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.