मुंबई: काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची नाराजी दूर करण्यात अखेर पक्षाला यश आलं आहे. दुय्यम दर्जाचं खातं देण्यात आल्यानं वडेट्टीवार गेल्या पाच दिवसांपासून नाराज होते. अखेर वडेट्टीवारांना मदत आणि पुनर्वसन खातं देण्याचा निर्णय पक्षानं घेतला. वडेट्टीवारांची नाराजी दूर करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. याच भेटीत वडेट्टीवारांना मदत आणि पुनर्वसन खातं देण्याचा निर्णय घेण्यात आला. माजी विरोधी पक्षनेते असलेले विजय वडेट्टीवार दुय्यम खाती देण्यात आल्यानं पाच दिवसांपासून नाराज होते. त्यामुळेच त्यांनी खात्यांचा पदभारदेखील स्वीकारला नव्हता. वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन ही खाती देण्यात आली होती. अखेर आज त्यांना मदत आणि पुनर्वसन खातं देण्यात आलं. यानंतर वडेट्टीवारांनी खात्याचा पदभार स्वीकारला. मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय, भाजपा पराभूत मी पक्षावर नाराज नव्हतो, तर पक्षाला मिळालेल्या खात्यांवर नाराज होतो, असं स्पष्टीकरण वडेट्टीवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिलं. मदत आणि पुनर्वसन ग्रामीण भागाशी संबंधित खातं आहे. पुनर्वसन खात्याशी शेतकऱ्यांच्या थेट संबंध येतो. त्यांना मदत देण्याचं काम या खात्यामार्फत होतं. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मी मदत आणि पुनर्वसन खात्यासाठी आग्रही होतो, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी खातेवाटप करताना झालेली एक चूक आणि वडेट्टीवारांची नाराजी यावर भाष्य केलं होतं. विजय वडेट्टीवार यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन हे खातं द्यायचं होतं, मात्र चुकून ते भूकंप पुनर्वसन असं लिहिलं गेलं. ती चूक दुरुस्त केली जाईल, असं अजित पवारांनी सांगितलं होतं. वडेट्टीवार नाराज असल्यानं भाजपानं त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न केले होते. वडेट्टीवारांनी योग्य निर्णय घ्यावा. आम्ही त्यांचं स्वागतच करू असं म्हणत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना थेट पक्ष प्रवेशाची ऑफरच दिली होती. यानंतर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्यानं वडेट्टीवारांची नाराजी दूर झाली.
भूकंप शब्द बदलला अन् राजकीय भूकंप टळला; वडेट्टीवारांची नाराजी दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 12:13 PM