नागपूर - विदर्भातून काँग्रेसनं मिशन निवडणूक हाती घेत स्वबळाचा नारा दिला. हाथ से हाथ जोडो असं अभियानाची सुरूवात केली. परंतु काँग्रेसमधील पक्षातंर्गत नाराजी पुन्हा उफाळून आली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांशी हाथ से हाथ जोडायले हवेत अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. काँग्रेस नेतेच एकमेकांचे शत्रू, भाजपा अथवा इतर पक्ष त्यांना शत्रू वाटत नाही असं विधान माजी आमदार आशिष देशमुख यांनी केले आहे.
आशिष देशमुख म्हणाले की, हाथ से हाथ जोडो अभियानाची सुरुवात महाराष्ट्रात होतेय पण काँग्रेसचे महाराष्ट्रातील जे मोठे नेते आहेत त्यांनी आपापसात हात जोडणे अतिशय गरजेचे आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं. नम्रतेने, अर्विभाव सोडून स्वत:चे हात जोडून जनतेपर्यंत जाण्याची त्यांची मानसिकता असेल तरच स्वबळाचा नारा सार्थ ठरू शकतो. ज्या अर्विभावाने नेते वागतात. आपापसातील मतभेदामुळे जनतेपासून पक्ष दूर चाललाय ही भावना कार्यकर्त्यांची आहे. या नेत्यांनी एकत्र येऊन पक्षाला बळ देण्यासाठी नेत्यांनी मेहनत घेणे अपेक्षित आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच कुठल्याही मोठ्या नेत्याला अर्ध्या रात्री जर उठवलं आणि त्यांना विचारलं तुमचा एक नंबरचा दुश्मन कोण आहे? तर नक्कीच त्यांच्या डोळ्यासमोर काँग्रेसचा दुसऱ्या नंबरचा नेता येईल. भाजपा किंवा विरोधी पक्षाबाबत ते दुश्मन म्हणून विचार करत नाहीत. ही भावना नेत्यांनी बदलली नाही तर पक्षाला पाहिजे तसं यश मिळणार नाही. हाथ से हाथ जोडो जसं नेत्यांसाठी गरजेचे आहे. तसे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीशी हात मिळवणे गरजेचे आहे त्याशिवाय महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पाहिजे तसे यश मिळणार नाही अशीही भावना आशिष देशमुखांनी मांडली.
दरम्यान, स्वबळाचा नारा कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी नाना पटोले मागील २ वर्षापासून देत आलेत. पण निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यात १०० टक्के महाविकास आघाडी निवडून येऊ शकते. त्यासाठी तिन्हीही पक्षांनी हाथ से हाथ जोडो करणे हे अतिशय गरजेचे आहे. विदर्भात स्वबळाचा नारा संयुक्तिक होऊ शकतो. पण राज्याच्या इतर भागात शिवसेना-राष्ट्रवादीसोबत राहिले तर काँग्रेस या तिघांमध्ये एक नंबरचा पक्ष बनून अतिशय चांगले सरकार पुढील काळात चालवू शकतो. त्यासाठी सामज्यंसाने घेणे, हाथ से हाथ जोडोसोबत दिलसे दिल जोडो करणे महत्त्वाचं आहे असंही आशिष देशमुखांनी सांगितले.