काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 07:18 AM2024-10-14T07:18:06+5:302024-10-14T07:18:28+5:30
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड हे नेते दिल्लीला रवाना झाले आहेत.
मुंबई : राज्यातील काँग्रेस नेते तातडीने राजधानी दिल्लीला रवाना झाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यातील नेत्यांची दिल्लीत बैठक बोलवली आहे. सोमवारी सकाळी दहा वाजता होणाऱ्या या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाईल.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड हे नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. या बैठकीत महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चा कुठपर्यंत पोहचली याचीही माहिती खरगे या नेत्यांकडून घेणार असल्याचे समजते.
राज्यातही आज बैठक
- काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या राज्य निवड मंडळाचीही सोमवारी बैठक होत आहे. मुंबईत टिळक भवन येथे दुपारी ४ वाजता ही बैठक होणार आहे.
- या बैठकीला बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यासह राज्य निवडमंडळाचे सदस्य उपस्थित राहणार
आहेत.