Congress Criticised Mahayuti Govt: सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यानंतर या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेते राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी करत आहेत. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. यातच काँग्रेस नेत्यांनी पुन्हा एकदा भाजपासह महायुतीवर हल्लाबोल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली. यावर, पंतप्रधानांनी माफी मागितल्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा घेतला असता तर त्या माफीवर विश्वास बसला असता. पण कृतीत काहीच नाही, फक्त पोकळ शब्द आहेत! मंत्री केसरकर म्हणाले काही तरी चांगले व्हायचे असेल म्हणून पुतळा कोसळला असेल. सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी असताना पुतळाप्रकरणी नौदलाकडे बोट दाखवले. महाराष्ट्राच्या निवडणुका समोर ठेवून फक्त माफी मागितली का, हा संशय येत आहे, अशी टीका काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अवमान करणाऱ्यांना सत्तेत राहायचा अधिकार नाही
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भाजपा सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे कोसळल्याने जनतेत तीव्र संताप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण घाईघाईने केले होते. राजकीय लाभ उठवण्यासाठी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केल्याने लोकांच्या भावना संतप्त झाल्या आहेत. मुख्यमंत्री माफी मागत असले तरी त्याचा काही फायदा नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अवमान करणाऱ्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, या शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, या सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो यावरून या पुतळ्याचे बांधकाम किती निकृष्ट दर्जाचे होते हे दिसते. आता राज्य सरकार याची जबाबदारी नौसेनेवर टाकत आहे तर नौसेनेने राज्य सरकारची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. राज्यात व केंद्रात डबल इंजिन सरकार आहे, ते जबाबदारी झटकत आहेत. महाराजांचा अपमान करणे हीच भाजपाची मानसिकता आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.