ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - गोव्यामध्ये क्रमांक एकचा पक्ष असूनही विरोधी बाकावर बसावं लागलेल्या काँग्रसेची घसरण सुरुच आहे. गुरुवारी आमदार विश्वजीत राणे यांनी पक्षाला सोडचि्ठी दिली असताना अजून एका नेत्याने पक्षातून काढता पाय घेतला आहे. सॅविओ रॉड्रीक्स यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे. राहुल गांधींना माझा नेता म्हणून मी स्विकारु शकत नाही असं म्हणत सॅविओ रॉड्रीक्स यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. सॅविओ रॉड्रीक्स हे गोवा काँग्रेसमधील अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष होते.
टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार 'काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी कोणतीही जबाबदारी घेत नाही आहेत. दिग्विजय सिंग काँग्रेसच्या परिस्थितीला जबाबदार आहेत', असं वक्तव्य सॅविओ रॉड्रीक्स यांनी केलं आहे. गोवा विधानसभेत पार पडलेल्या बहुमत चाचणीवर बोलताना सॅविओ रॉड्रीक्स यांनी ही टीका केली आहे. विशेष म्हणजे काँग्रसेच्या या पराभवला दिग्विजय सिंग जबाबदार असल्याचं मनोहर पर्रिकरही बोलले होते.
गोव्यात सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी पक्षात बसावे लागलेल्या काँग्रेसला गुरुवारी एक मोठा धक्का बसला. गोव्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि आमदार विश्वजीत राणे यांनी पक्षाचा राजीनामा दिला . गोव्यातील जनतेने जो कौल दिला त्याचा पक्षाने विश्वासघात केला असा आरोप विश्वजीत राणे यांनी केला. ते काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमधील मुख्य दावेदार होते. विश्वजीत राणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा होती, अखेर ती खरी ठरली.
Delhi leaders of Congress come and play their money games in Goa. You don't care about Goans or party men. @nayanchandra@OfficeOfRG— Savio Rodrigues (@PrinceArihan) March 16, 2017
'पक्षातील गैरव्यवस्थापनाविरोधातील हे माझं पहिलं पाऊल आहे. पक्षासोबत राहण्याचा माझा कोणताही विचार नाही. पक्षाला मी कंटाळलो असून पुन्हा निवडणूक लढण्यास तयार आहे', असं राणे बोलले होते.
गोव्यात सर्वाधिक 17 जागा जिंकूनही काँग्रेसला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने भाजपला दोन दिवसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. गोव्यात काँग्रेसला सर्वाधिक जागा (17) जिंकूनही सत्ता स्थापण्याचा दावा करता आला नाही, तर केवळ 13 जागा जिंकूनही राज्यपालांनी भाजपाला सरकार स्थापण्यासाठी आमंत्रण दिले, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यामुळे याकडे देशाचं लक्ष लागलं होतं.
40 सदस्य असलेल्या विधानसभेत एकूण 22 आमदारांचे संख्याबळ पर्रीकर सरकारसोबत आहे. त्यात भाजपाचे स्वत:चे 13 आमदार आहेत. कुंकळयेकर यांची हंगामी सभापती म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय पर्रीकर यांनी घेतला. बुधवारी सकाळी त्याबाबतची फाईल सरकारने राज्यपालांकडे पाठवली व सायंकाळी राज्यपालांनी कुंकळयेकर यांना शपथ दिली. राजभवनवर त्या वेळी मुख्यमंत्री पर्रीकर उपस्थित होते. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी बुधवारी मंत्रालयात केबिनचा ताबा घेतला व काम सुरू केले. अन्य मंत्र्यांना अजून खाती मिळालेली नसल्याने त्यांनी केबिनचा ताबा घेतलेला नाही. बहुमत सिद्ध केल्यानंतर आपण खाते वाटपाची प्रक्रिया सुरू करीन, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी म्हटले आहे.