जळगाव - आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष तयारीला लागलेत. त्यात आता पक्षप्रवेशांची रीघ लागली आहे. आपापला मतदारसंघ आणि स्थानिक राजकीय समीकरणं जुळवण्यासाठी पक्षांतरांची चढाओढ लागल्याचे येत्या काही काळात पाहायला मिळेल. लोकसभा निवडणुकीचे वारे आता वेगात वाहत आहेत. त्यातच रावेर मतदारसंघातील माजी खासदार आणि काँग्रेस नेते उल्हास पाटील यांची कन्या डॉ. केतकी पाटील या भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असतांना गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील या लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. डॉ. केतकी पाटील यांचे रावेर लोकसभा मतदारसंघात गाव तेथे संपर्क अभियान सुरु आहे. या मतदारसंघात त्यांना अपेक्षित प्रतिसाददेखील मिळत आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी डॉ. सहस्त्रबुद्धे यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
डॉ. केतकी पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, आमदार एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. केतकी पाटील या रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार असू शकतात असा दावा केला होता. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा जळगावात दौरा झाला होता. या कार्यक्रमापासून डॉ. केतकी पाटील लांब राहिला होत्या. या सर्व घटना व घडामोडी पाहता डॉ. केतकी पाटील या लवकरच भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाविकास आघाडीत रावेरच्या जागेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत चढाओढ आहे. रावेरची जागा काँग्रेसची असून ती मिळवण्यासाठी शरद पवार गटाचा प्रयत्न आहे. याठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी एकनाथ खडसे स्वत: इच्छुक आहेत. सध्या रावेरच्या जागेवर खडसेंची सून विद्यमान खासदार रक्षा खडसे या खासदार आहेत. या मतदारसंघात गेल्यावेळी आघाडीने काँग्रेसकडून डॉ. उल्हास पाटील यांनी निवडणूक लढली होती. मात्र यंदा काँग्रेस आणि गांधी घराण्याशी निष्ठावंत असलेले माजी खासदार उल्हास पाटील यांची कन्या केतकी पाटील यांना उमेदवारी मिळेल अशी चिन्हे होती. परंतु आता केतकी पाटीलच भाजपाच्या वाटेवर असल्याचं पुढे येत आहे.