काँग्रेस नेते रात्री गडकरींशी फोनवर बोलायचे, गद्दारी खपवून घेणार नाही; विकास ठाकरेंचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 09:27 AM2024-10-09T09:27:36+5:302024-10-09T09:28:41+5:30
विधानसभा निवडणुकीत जर कुणी गद्दारी केली तर त्याला बाहेरचा रस्ता दाखविल्याशिवाय सोडणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: नागपूर शहरात काँग्रेस नेते लोकसभेची निवडणूक एकदिलाने लढले, असे वाटत असले तरी प्रत्यक्षात उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले आ. विकास ठाकरे हे नेत्यांच्या कामावर समाधानी नाहीत. लोकसभा निवडणुकीत भाजप नेते नितीन गडकरी यांनी फोन केल्याने काँग्रेसचे अनेक नेते घरी शांत बसले. ते दिवसभर काँग्रेससोबत फिरायचे व रात्री गडकरींशी फोनवर बोलायचे, असा उघड आरोप आ. ठाकरे यांनी केला आहे.
आ. ठाकरे यांनी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढविली. ते पराभूत झाले. रविवारी नागपुरात झाकीर हुसैन मंचच्यावतीने नवनियुक्त लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. हे निमित्त साधत आ. ठाकरे यांनी पक्षातील गद्दारांवर तोफ डागली. लोकसभेचे मी आता सोडून दिले. पण, विधानसभा निवडणुकीत जर कुणी गद्दारी केली तर त्याला बाहेरचा रस्ता दाखविल्याशिवाय सोडणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.