ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 21 - विदर्भाच्या बाजूने काँग्रेस नेत्यांनी घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे. किंबहुना विदर्भातील काँग्रेस नेत्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाची आहे. सरकारशी संघर्ष करण्यासाठी विदर्भातील नेत्यांसाठी हा महत्त्वाचा मुद्दा असून, ज्याप्रमाणे काँग्रेसचे माजी मंत्री रणजित देशमुख यांनी विदर्भाच्या नावावर स्वतंत्र पार्टी तयार केली होती त्याच धर्तीवर काँग्रेसच्या नेत्यांनी विदर्भ प्रदेश काँग्रेस कमिटी स्थापन करावी, असे मत विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. निवृत्ती वेतन (१९९५) समन्वय समितीच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी ते आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले काँग्रेसच्या विदर्भातील नेत्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका घेतली आहे. या भूमिकेमुळे पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील नेते एकमेकांशी भिडले आहे. परंतु पक्षावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. काँग्रेस पक्षासाठी नेत्यांनी घेतलेला स्टॅण्ड अतिशय महत्त्वाचा आहे. यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी अनेकदा विदर्भाच्या मुद्यावर आंदोलन केले. परंतु देशात व राज्यात काँग्रेस सत्तेवर असल्यामुळे वरिष्ठांकडूनच हे आंदोलन दाबण्यात आले. काँग्रेसच्या नेत्यांना सध्या चांगली संधी आहे. त्यासाठी विदर्भ प्रदेश काँग्रेस कमिटी स्थापन करून सरकारशी लढा दिल्यास महत्त्वपूर्ण राहील.