इंदिरा गांधींविषयीच्या संजय राऊत यांच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेस नेतृत्वाचे मौन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 11:19 AM2020-01-16T11:19:31+5:302020-01-16T14:32:39+5:30
काँग्रेसपासून बाजुला गेलेले संजय निरुपम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेवर पश्चातापाची वेळ येईल, असं निरुपम यांनी म्हटले आहे.
मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वादळी मुलाखतीमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. या मुलाखतीतील काही खुलासे काँग्रेसला अडचणीत आणणारे आहेत. त्यामुळे आघाडीला धक्का बसतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याविषयी केलेले वक्तव्य काँग्रेसला रुचणारे नाही. मात्र राज्यातील काँग्रेस नेतृत्वाकडून यावर अद्याप मौन पाळले गेले आहे.
लोकमतने घेलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी अंडरवर्ल्ड विषयीच्या आठवणी सांगितल्या. अंडरवर्ल्डमध्ये आता किरकोळ लोक आहेत. दाऊद इब्राहिमला मी पाहिलेलं आहे. त्याला दमही दिलेल्याचे राऊत यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अंडरवर्ल्डचा महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यावेळी असलेल्या प्रभावविषयी सांगितले. त्याकाळी छोटा शकील, दाऊद हेच ठरवायचे पोलीस कमिशनर कोण होणार, हाजी मस्तान मंत्रालयात गेल्यावर संपूर्ण मंत्रालय त्याला घ्यायला खाली यायचे, अंस राऊत यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी एक गौप्यस्फोट केला. कुविख्यात गुंड करिम लाला याला भेटायला इंदिरा गांधी आल्या होत्या, असं संजय राऊत यांनी म्हटले. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखवल्या आहेत. मात्र राज्यातील काँग्रेस नेतृत्वाकडून अद्याप यावर काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान काँग्रेसपासून बाजुला गेलेले संजय निरुपम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेवर पश्चातापाची वेळ येईल, असं निरुपम यांनी म्हटले आहे.