‘ते’ पत्र सार्वजनिक केल्याने काँग्रेसचे नेतृत्व नाराज; केदार यांच्याविरुद्ध आशिष देशमुखांचे पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 06:28 AM2021-08-28T06:28:31+5:302021-08-28T06:28:54+5:30
पक्षाचे सचिव प्रणव झा यांनी हे प्रकरण जुने असल्याचे सांगत स्पष्ट केले आहे की, एखाद्याला आपले म्हणणे पक्षात मांडण्याचा अधिकार आहे. पण, पक्षाध्यक्षांना लिहिलेले पत्र सार्वजनिक करण्याचा प्रकार नेतृत्व सहन करणार नाही.
- शीलेश शर्मा
लोकमत न्यूज नेटवर
नवी दिल्ली : पंजाब, छत्तीसगढ आणि राजस्थाननंतर आता महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. प्रदेश काँग्रेसमध्ये सरचिटणीसपदी दोनच दिवसांपूर्वी नियुक्ती झालेल्या आशिष रणजीत देशमुख यांनी आघाडी सरकारमधील मंत्री सुनील केदार यांच्याविरोधात एक पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले आहे. मात्र, हे पत्र सार्वजनिक केल्यामुळे पक्ष नेतृत्व नाराज आहे. सूत्रांनी सांगितले की, पक्ष नेतृत्व याला अंतर्गत गटबाजीचा परिणाम मानते.
पक्षाचे सचिव प्रणव झा यांनी हे प्रकरण जुने असल्याचे सांगत स्पष्ट केले आहे की, एखाद्याला आपले म्हणणे पक्षात मांडण्याचा अधिकार आहे. पण, पक्षाध्यक्षांना लिहिलेले पत्र सार्वजनिक करण्याचा प्रकार नेतृत्व सहन करणार नाही.
पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांचेही म्हणणे आहे की, अशा प्रकारे सार्वजनिक वक्तव्ये पक्ष स्वीकार करणार नाही. आशिष देशमुख यांच्या पत्रामागे काँग्रेसच्याच काही नेत्यांचा हात आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या एका माजी केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले आशिष देशमुख हे पुन्हा भाजपमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत.
केवळ भाजप नेतृत्वाचा विश्वास जिंकण्यासाठी ते सातत्याने आघाडी सरकारविरुद्ध वक्तव्ये करीत आहेत. सावनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर ते केदार यांच्या विरुद्ध निवडणूक लढण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे लवकरच ते भाजपमध्ये जातील. दरम्यान, आशिष देशमुख यांच्या पत्रामागचा हेतू काय होता तसेच कोणाच्या इशाऱ्यावरून हे पत्र लिहिले गेले याची माहिती पक्ष नेतृत्व घेत आहे.