मुंबई : ‘लक्ष्मी’ दर्शनाच्या चर्चेने गाजलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने मुंबईसह कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार अशा तीन जागा जिंकून बाजी मारली. तर भाजपा, शिवसेनेने प्रत्येकी दोन आणि राष्ट्रवादीने एक जागा जिंकली. सोलापुरात विद्यमान आमदार दीपक साळुंखे यांचा अनपेक्षित पराभव करून भाजपा पुरस्कृत प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादीला जबर धक्का दिला. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची एक-एक जागा कमी झाली. विधान परिषदेच्या सात जागांसाठी २७ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. नागपूरची जागा यापूर्वीच बिनविरोध निघाली असून तेथे भाजपाचे गिरीश व्यास निवडून आले. उर्वरित सात जागांचे निकाल बुधवारी जाहीर झाले. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबईतील दुसऱ्या जागेवर काँग्रेसचे भाई जगताप अवघ्या तीन मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादीचे बंडखोर प्रसाद लाड ५५ तर जगताप यांना ५८ मते मिळाली. निकालानंतर लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानल्याने भाजपाची त्यांना आतून साथ होती हे स्पष्ट झाले. शिवसेनेकडे मतांचा पुरेसा कोटा असल्याने रामदास कदम पहिल्याच फेरीत विजयी झाले. मात्र निकालानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सूर आळवला. शिवसेनेने आपल्याकडील अतिरिक्त मते लाड यांच्या पारड्यात न टाकता कदमांचे संख्याबळ वाढविण्यावर भर देत लाड यांना जिंकवण्याच्या भाजपाच्या मनसुब्यांना सुरुंग लावला. कोल्हापुरात भाजपा पुरस्कृत महादेवराव महाडिक विरुद्ध काँग्रेसचे सतेज पाटील यांच्यात झालेल्या संघर्षपूर्ण लढतीत अखेर पाटील यांनी बाजी मारली. सोलापुरात मोठा उलटफेर झाला. भाजपा पुरस्कृत अपक्ष प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादीचे तगडे उमेदवार दीपक साळुंखे यांचा दारुण पराभव करत सर्वांनाच चकमा दिला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी हा सोलापुरी झटका मानला जातो. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी राष्ट्रवादीने काँग्रेसला फक्त कोल्हापुरात साथ दिल्याचे दिसून येते. तर मुंबईत राष्ट्रवादीचे प्रसाद लाड यांनी केलेली बंडखोरी सोलापुरात राष्ट्रवादीला महागात पडली. काँग्रेसची मते परिचारकांकडे फिरली. धुळे-नंदुरबारमध्ये भाजपाला फक्त ३१ मते मिळाल्याने नाचक्की झाली. काँग्रेसचे अमरीशभाई पटेल यांनी दणदणीत विजय मिळविला. अकोल्याची जागा शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांनी राखून हॅट्ट्रिक साधली. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचे अरुण जगताप यांचा ६६ मतांनी विजय झाला. नागपुरात भाजपाचे गिरीश व्यास याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. (विशेष प्रतिनिधी)मुंबई रामदास कदम (शिवसेना) ८६भाई जगताप (काँग्रेस) ५८प्रसाद लाड (अपक्ष) ५५(रामदास कदम आणि भाई जगताप विजयी)कोल्हापूर सतेज पाटील (काँग्रेस) २२०महादेवराव महाडिक (भाजपा पुरस्कृत अपक्ष) १५७अवैध मते ०५(सतेज पाटील ६३ मतांनी विजयी)अहमदनगर अरुण जगताप (राष्ट्रवादी) २४३प्रा. शशिकांत गाडे (शिवसेना) १७७जयंत ससाणे ०१अवैध मते ०७(अरुण जगताप ६६ मतांनी विजयी)सोलापूर प्रशांत परिचारक (भाजपा पुरस्कृत अपक्ष) २६१दीपक साळुंखे (राष्ट्रवादी) १२०अवैध १५(प्रशांत परिचारक १४१ मतांनी विजयी)अकोला गोपीकिशन बाजोरिया (शिवसेना)५१३रवींद्र सपकाळ (राष्ट्रवादी) २३९अवैध मते २९नोटा ०५(गोपीकिशन बाजोरिया २७४ मतांनी विजयी)धुळे-नंदुरबारअमरीश पटेल (काँग्रेस)३५२डॉ. शशिकांत वाणी (भाजपा)३१अवैध मते०७नोटा०२(अमरीश पटेल ३२१ मतांनी विजयी)
विधान परिषदेचे गड काँग्रेसने राखले
By admin | Published: December 31, 2015 4:25 AM