कराड : काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीचा आढावा घेण्यासाठी पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक दीपावलीनंतर घेण्याचे ठरले आहे़ ही बैठक सोमवारी किंवा मंगळवारी होईल़, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली़राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांची प्राथमिक बैठक झाली असून, या बैठकीत अजित पवार यांनी काँग्रेस नेत्यांच्या फोनबाबत केलेल्या वक्तव्याबाबत चर्चा झाली़ त्या वेळी विधिमंडळ पक्षाची बैठक दीपावलीनंतर बोलावण्याचे ठरले आहे. राज्यात अजूनही अस्थिर परिस्थिती आहे. सरकार कसे बनणार, यावर बरेच काही अवलंबून आहे़ काँग्रेसने मात्र सकारात्मक भूमिका घेतली आहे़ कोलकात्याच्या एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीनंतर काही ‘आॅफ रेकॉर्ड’ चर्चा झाली होती़ ती चर्चाही प्रसिद्ध करण्यात आली़ वास्तविक संबंधितांचे महाराष्ट्राच्या राजकारणाचे ज्ञान कमी पडले असावे़ त्यामुळे त्यांनी ही मुलाखत वेगळ्या पद्धतीने प्रसिद्ध केली़ त्यातही मी न बोललेले मुद्दे आहेत़ या मुलाखतीनंतर आपण दिलगिरीही व्यक्त केली़ मात्र, माझ्या सहकाऱ्यांना त्याचा त्रास झाला. मला जर कोणाविषयी बोलायचेच असते, तर मी कोलकात्याच्या दैनिकाला मुलाखत दिली नसती़ महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रांना दिली असती, असे स्पष्टीकरणही चव्हाण यांनी दिले. मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीत कऱ्हाडच्या विकासासाठी निधी आणला़ आता नव्या सरकारच्या माध्यमातून व बाहेरूनही निधी आणून कऱ्हाडच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चव्हाण म्हणाले, कऱ्हाड दक्षिणची निवडणूक ऐतिहासिक झाली़ मला दिल्लीला जाण्यात कोणताही रस नसून, कऱ्हाड व मुंबई हे आपले कार्यक्षेत्र असणार आहे़ कऱ्हाड शहरासह ग्रामीण भागात आपल्याला चांगले मतदान झाले़, त्यामुळे विजय शक्य झाला़ कऱ्हाडशी नियमित संपर्क ठेवणार असून, पाडव्यापसून संपर्क मोहीम सुरू करणार आहे. (प्रतिनिधी)
काँग्रेस विधिमंडळाची बैठक दिवाळीनंतर - पृथ्वीराज चव्हाण
By admin | Published: October 24, 2014 3:54 AM