अकोल्यात काँग्रेसचा प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 11:46 AM2018-12-25T11:46:57+5:302018-12-25T11:49:46+5:30
आंबेडकरांना अकोल्यात पाठिंबा देऊन राज्यभरात दलित मतं मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई: आगामी लोकसभेसाठी एमआयएमसोबत युती केलेल्या भारिप बहुजन महासंघाच्याप्रकाश आंबेडकरांनाकाँग्रेस अकोल्यात पाठिंबा देण्याची शक्यता आहे. आंबेडकरांना अकोल्यात पाठिंबा देऊन राज्यभरात दलित मतं मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र अद्याप यावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलेलं नाही.
प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाला महाआघाडीत घेण्यासाठी काँग्रेसनं प्रयत्न केले. मात्र, आंबेडकर यांनी असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमसोबत हातमिळवणी केली. यानंतरही काँग्रेसकडून आंबेडकरांना महाआघाडीत घेण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यांनी एमआयएमलादेखील महाआघाडीत घेण्याची अट घातली. ही अट काँग्रेसनं अमान्य केली. भाजपाला सत्तेपासून रोखायचं असल्यास धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळावं लागेल, असं राज्यातील काँग्रेस नेत्यांना वाटतं. त्यामुळेच काँग्रेसकडून आंबेडकरांना अकोला लोकसभा मतदारसंघात पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे. अकोल्यात भारिप बहुजन महासंघाला पाठिंबा देऊन राज्यभरात त्यांची मतं मिळवायची, असा काँग्रेसचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यातील महाआघाडीत प्रकाश आंबेडकरांचा प्रवेश व्हावा, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी प्रयत्नशील आहेत. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांबद्दल आंबेडकरांनी गेल्याच आठवड्यात शंका उपस्थित केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सुरू असलेला महाआघाडीचा प्रयत्न म्हणजे निव्वळ फार्स असल्याचं टीकास्त्र भारिपा बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोडलं होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं लोकसभेचं जागावाटप पूर्ण झालं आहे. त्यामुळे आम्हाला आघाडीत घेण्यासाठी त्यांच्याकडून सुरू असलेला प्रयत्न हा निव्वळ दिखावा असल्याचं आंबेडकर म्हणाले होते.