- अतुल कुलकर्णी२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे दोन खासदार होते. २०१९ साली तेही उरले नाहीत. चंद्रपूरची जी एकमेव जागा मिळाली ती देखील शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्यामुळे! शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन ते काँग्रेसमध्ये आले पण त्यांचेही तिकीट काँग्रेस नेत्यांनी राजकीय कुरघोडीत कापले होते. नंतर ते दिले आणि त्यामुळे काँग्रेसला सांगण्यासाठी एक खासदार तरी महाराष्ट्रात उरला. या अपयशाचे श्रेय प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील या दोघांचेच आहे.साडेचार वर्षे विरोधी पक्षनेते पद भूषविणाऱ्या विखे यांनी कधीच भाजप-शिवसेना सरकारला अडचणीत आणले नाही. तुम्ही असे का वागता असा जाब प्रदेशाध्यक्ष या नात्याने अशोक चव्हाण किंवा श्रेष्ठींनी विखेंना विचारला नाही. बेरोजगारी, नोटबंदी, दुष्काळ असे अनेक विषय असतानाही राज्य ढवळून काढण्याचे काम या नेत्यांनी केले नाही. राज्यातल्या काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, पण काँग्रेसने कधी हा विषय लावून धरला नाही. उलट विरोधी पक्षाचे काम सत्तेत राहून शिवसेनेने केले आणि काँग्रेस नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यात सगळा वेळ घालवला.पाच वर्षात कार्यकर्त्यांना कार्यक्रम देण्याचे कामही कधी या नेत्यांनी केले नाही. काँग्रेस राज्यात अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न पडावा एवढा निरुस्ताह पक्षात होता. लोकसभा निवडणुकांसाठी बूथ बांधणी, कार्यकर्त्यांची जोडणी, नेत्यांना जबाबदारीचे वाटप करणे अशी मुलभूत कामेही झाली नाहीत. पृथ्वीराज चव्हाण यांचा विधानसभेत वापर करुन घेतला नाही. माध्यमे त्यांच्या बोलण्याची दखल घेतात हे माहिती असूनही त्यांना कधी मुंबईत बोलू दिले नाही. त्यांना कधी पुण्याला तर कधी औरंगाबादला जा, असे सांगितले जायचे. आपल्यापेक्षा अन्य कोणीही मोठा होऊ नये हेच ध्येय ठेवून निवडणुकीला सामोरे गेले की जे व्हायचे तेच येथे झाले.जागा वाटपात जो घोळ घातला गेला त्याला तोड नव्हती. औरंगाबादची जागा राष्टÑवादीने मागूनही ती दिली नाही, पुण्याच्या जागेबद्दलही शेवटपर्यंत घोळ घातला गेला. राहुल गांधी यांची मुंबईत एकही सभा झाली नाही आणि अशोक चव्हाण नांदेडच्या बाहेर पडले नाहीत.>संपूर्ण अपयशकाँग्रेसने २५ जागा लढवल्या. त्यापैकी १५ ठिकाणी त्यांची भाजपासोबत तर १० ठिकाणी शिवसेनेसोबत लढत होती. त्यातील सेनेसोबतची एक जागा जिंकता आली.राहुल गांधी यांनी नागपूर, चंद्रपूर, नांदेड, संगमनेर या चार ठिकाणी जाहीर सभा घेतल्या तर पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुंबईकडे त्यांनी पाठ फिरवली.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा नांदेडमध्ये व्हावी असे अशोक चव्हाण यांना वाटले, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले व राज यांनी सभा घेतली, यातच सगळे काही आले.
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: उमेद हरवलेली काँग्रेस विजयापासून ‘वंचित’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 5:11 AM