Maharashtra Politics: नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासूनच काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळ चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली. यानंतर सत्यजित तांबे यांनी अनेक गौप्यस्फोट केले. त्यातच बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधानसभेतील गटनेतेपदाचा राजानामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. याबाबत एच. के. पाटील यांनी सविस्तर माहिती दिली.
या भेटीनंतर बोलताना एच. के. पाटील म्हणाले की, थोरातांचे पूर्ण ऐकून घेतले. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्षांना भेटलो होतो. याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच राज्यात झालेले गैरसमज त्यांच्यापर्यंत पोहोचवले. मागील काही दिवसांत झालेले गैरसमज काँग्रेस पक्षाचे कौटुंबिक आहेत. या समस्या लवकरच सोडवण्यात येतील. तसेच बाळासाहेब थोरात रायपूर येथे होणाऱ्या पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा मान्य करण्याचा विषयच येत नाही
बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा मान्य करण्याचा विषयच येत नाही. बाळासाहेब थोरातांना विनंती केली की, तुम्ही काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहा. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि थोरात यांची भेट होणार आहे. तसेच थोरात यांचा राजीनामा मंजुर झाला नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"