मुंबई : वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) विधेयक मंजूर होऊन त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळू नये म्हणून काँग्रेस पक्षाने संसदेत गोंधळ चालविला असल्याचा आरोप केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केला. जीएसटी लागू झाल्याने देशाचा विकासदर दीड टक्क्याने वाढणार असून, आर्थिक क्षेत्रात भारताची ताकद वाढणार आहे हे लक्षात घेता जीएसटी अडविण्याचे काँग्रेसचे पाऊल विकासविरोधी आहे. पण संसदेच्या चालू अधिवेशनात कोणत्याही परिस्थितीत सरकार हे विधेयक मंजूर करेल, असे ते म्हणाले. तेलंगणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने आपल्याच पक्षाचे खासदार निलंबित केले होते. देशावर आणीबाणी लादली तेव्हा अनेक खासदारांना तुरुंगात पाठविणाऱ्या काँग्रेसने आता लोकशाहीच्या नावाने गळा काढू नये, असे जावडेकर म्हणाले. काँग्रेसच्या भूमिकेला त्याच पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांचा विरोध आहे, असा दावा त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)तेव्हा किती मिळाले? : संरक्षणमंत्री सुषमा स्वराज यांचे वकील पती आणि कन्येच्या उत्पन्नाबाबत निराधार आणि खालच्या दर्जाचे प्रश्न काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. ललित मोदी पळून जाण्यासाठी, त्यांना रेडकॉर्नर नोटीस बजावली नाही म्हणून काँग्रेसला किती पैसा मिळाला, असे प्रश्न लोक काँग्रेसच्या या नेत्यांना विचारू शकतात, आम्हीही तेच विचारू इच्छितो, असेही जावडेकर म्हणाले.
जीएसटी अडविण्यासाठी काँग्रेसकडून गोंधळ
By admin | Published: August 09, 2015 2:37 AM