मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं शुभमंगल येत्या २७ जानेवारीला होतंय. मिताली बोरुडे या मैत्रिणीशी त्याची लगीनगाठ बांधली जाणार आहे. त्यामुळे 'कृष्णकुंज'वर सध्या लगीनघाई सुरू आहे. पण, राजकीय वर्तुळात काँग्रेस-मनसेच्या मनोमीलनाची चर्चा रंगलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उभ्या राहिलेल्या महाआघाडीशी गाठ बांधण्याचा प्रयत्न या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने होऊ शकतो, अशी कुजबूज ऐकू येतेय. ही चर्चा म्हणजे, संक्रातीच्या मुहूर्तावर सुरू असलेली पतंगबाजी असल्याचं मनसेची मंडळी म्हणताहेत, तर काही जण 'आमंत्रणातील राजकारणा'कडे बोट लक्ष वेधत आहेत.राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात उघडलेली 'व्यंगचित्र मोहीम' सर्वांनाच ठाऊक आहे. मोदी सरकारच्या धोरणांवरही त्यांनी टीकास्त्र सोडलंय. या सरकारच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं. या आवाहनातच, महाआघाडीत सहभागी होण्याचा प्रस्ताव-होकारही दडला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी जवळचे संबंध असल्यानं महाआघाडीशी 'इंजिन' जोडलं जाणं तसं कठीण नव्हतं. परंतु, काँग्रेस नेत्यांनी 'हात' मागे घेतले आणि 'टाळी' चुकली. परप्रांतीयांविरोधातील मनसेची 'खळ्ळ-खटॅक' भूमिका काँग्रेसला मान्य नाही. हा वर्ग काँग्रेसचा मतदार असल्यानं मनसेला सोबत घेणं आपल्याला महाग पडू शकतं, असं महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचं ठाम मत आहे. मुंबई-महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि राज ठाकरे यांच्यात अनेकदा शाब्दिक चकमकीही झाल्यात. त्यामुळे महाआघाडीचा मार्ग राज यांच्यासाठी थोडा कठीणच आहे. या पार्श्वभूमीवर, राज ठाकरेंनी चिरंजीव अमितच्या लग्नासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना दिलेलं आमंत्रण सूचक मानलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना त्यांनी पत्रिका पाठवलेली नाही. पण, सोनिया-राहुल यांना आग्रहाचं निमंत्रण केलंय. हे त्यांनी मनोमीलनासाठी टाकलेलं एक पाऊल तर नाही ना, असं बोललं जातंय. थेट 'हायकमांड'नेच आदेश दिल्यास महाआघाडीची दारं मनसेसाठी सहज उघडली जाऊ शकतात, याकडे जाणकार लक्ष वेधत आहेत. मात्र त्याचवेळी, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून नेतेमंडळी एकमेकांकडे लग्न सोहळ्याला गेल्याची उदाहरणं दाखवून मनसेचे शिलेदार ही Marriage Diplomacy ची शक्यता फेटाळून लावत आहेत.
शरद पवारांचं 'साधं-सरळ' गणितमोदी सरकारविरोधात महाआघाडीची घडी बसवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शरद पवार यांना मनसेची ताकद नेमकी ठाऊक आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेला यश मिळालं नसलं, तरी त्यांना मतदान करणारा एक वर्ग आहे. शिवसेनेची मतं मनसे फोडू शकते आणि त्याचा फटका - युती झाल्यास भाजपालाही बसू शकतो. पर्यायाने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी हे गणित फायद्याचं ठरू शकतं, असं पवारांचं समीकरण आहे. ते काँग्रेसला पटतं का आणि 'राज'कारणाला वेग येतो का, हे लवकरच स्पष्ट होईल.