मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी एक आदर्श उपक्रम हाती घेतला आहे. अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये स्वतःचेच अनधिकृत बॅनर हटविले आणि यापुढे शहरात असे बॅनर न लावण्याचा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
अशोक चव्हाण शनिवारी सकाळी नांदेडमधील निवासस्थानाहून जात असताना त्यांना रस्त्यात काँग्रेसचे एक अनधिकृत बॅनर दिसले. या बॅनरवर त्यांना स्वतःचाच फोटो दिसला. त्यानंतर त्यांनी लगेच आपला गाडीचा ताफा थांबविला आणि स्वतः गाडीतून उतरून कार्यकर्त्यांच्या मदतीने तो बॅनर काढून टाकला.
या घटनेनंतर प्रशासनाचे अधिकारी याठिकाणी दाखल झाले. यावेळी नांदेड शहरात यापुढे अनधिकृत बॅनर लावू देणार नसल्याचे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तसेच, पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना अशोक चव्हाण यांनी सूचना दिल्या आहेत की, यापुढे शहरात कुठेही अनधिकृत बॅनर लागणार नाहीत. अन्यथा हायकोर्टाच्या निर्णयानुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात येतील.
दरम्यान, गेल्या सोमवारी अशोक चव्हाण नांदेड दौऱ्यावर असताना त्यांचा व्हीआयपी ताफा येणार असल्याने शिवाजीनगर येथील कुसुमताई चौकात दोन्ही रस्त्याची वाहतूक थांबविण्यात आली होती. मात्र, एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने अचानक अशोक चव्हाण यांचाच ताफा थांबविला आणि इतर गाड्या जाण्यास रस्ता मोकळा करून दिला. याने सारेच अवाक झाले. पण, या वाहनांच्या गराड्यातून एक रुग्णवाहिका पुढे गेल्याने ताफा थांबवण्याचे कारण स्पष्ट झाले. यामुळे तेथून निघताना अशोक चव्हाण यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याचे कौतुक करत स्मितहास्य करून दाद दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या
'राहुल गांधींना निवडून देणं ही केरळच्या जनतेची मोठी चूक'
निर्भयाच्या आईनं दोषींना माफ करावं, ज्येष्ठ वकिलाचा अजब सल्ला
'देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा असणं गरजेचं'
मुंबई-पुणे ‘हायपर लूप’ प्रकल्प ‘नको रे बाबा’; उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका
‘मेगा’ भरती ही भाजपाची मेगा चूक; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कबुली