मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार चालवताना किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी होईल याकडे काँग्रेस मंत्र्यांनी लक्ष द्यावे तसेच संविधानाला अनुसरुन काम झाले पाहिजे, असे अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसचे मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत आवाहन केले आहे.
टिळक भवन येथे आज राज्यातील काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची व काँग्रेस मंत्र्यांची बैठक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खर्गे म्हणाले की, या सरकाराचे काम किमान समान कार्यक्रमावर आधारीत चालावे. काँग्रेसच्या मंत्र्यांकडे जे जिल्हे पालकमंत्री म्हणून आले आहेत त्या जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे तसेच ज्या जिल्ह्यांना काँग्रेसचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी सरकारच्या योजना, सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहचवून काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी प्रयत्न करावा.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुका व मंत्रीमंडळ स्थापन झाल्यानंतर खर्गे यांच्या उपस्थितीत ही पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीत आतापर्यत काय झाले याचा आढावा घेण्यात आला तसेच पुढे कसे जायचे यावरही चर्चा करण्यात आली. किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
बैठकीला देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, महिला व बालकल्याण मंत्री यशोमतीताई ठाकूर, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, गृहराज्यमंत्री सतेज बंटी पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व गुजरातचे प्रभारी राजीव सातव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, सोनल पटेल, वामशी चंद रेड्डी, भी. एम. संदीप, बसवराज पाटील, मधुकर चव्हाण, नसीम खान, वसंत पुरके, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते शरद रणपिसे, आ. संग्राम थोपटे, आ. कैलाश गोरंट्याल आ. रामहरी रूपनर, आ. शिरीष चौधरी, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, मोहन जोशी आदी उपस्थित होते.
या बैठकीनंतर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांच्या उपस्थितीत प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली.