मोसीन शेख
मुंबई - काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांनी रविवारी अचानक शिवसेनेत प्रवेश केला. सत्तार यांच्या प्रवेशाने औरंगाबाद जिल्ह्यात सेनेचे बळ वाढणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच त्यांच्या प्रवेशावेळी पैठणचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेस नेते जितसिंग करकोटक यांनी सुद्धा हातात शिवबंधन बांधले आहे. करकोटक यांच्या प्रवेशाने पैठणचे शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांची तालुक्यातील राजकीय ताकद वाढणार आहे. त्यामुळे पैठण तालुक्यातील शिवसैनिकांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला.अब्दुल सत्तार यांनी सोमवारी मातोश्रीवर सेनेत प्रवेश केला. त्यांच्या सोबत त्यांना मानणारा काँग्रेसमधील मोठा वर्ग सुद्ध शिवसेनेत गेला आहे. सेनेचा बालेकिल्ला आणि आमदार भुमरे यांचा मतदारसंघ असलेल्या पैठमधील काँग्रेसचे नेते जीतसिंग करकोटक यांनीसुद्धा सत्तार यांच्या सोबत शिवसेनेत प्रवेश केला. करकोटक यांच्या प्रवेशाने पैठणमधील सेनेचे ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे करकोटक यांचा सेनेत प्रवेश होताच पैठणच्या शिवसैनिकांनी फटाके वाजवत जल्लोष साजरा केला.अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी माजी मंत्री अनिल पटेल यांची वर्णी लागली होती. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे सूत्र पैठणकराच्या हाती आले. त्यातच अनिल पटेल राजकारणात सक्रिय झाल्याने पैठण तालुक्यातील काँग्रेसचे बळ वाढताना दिसत होते. मात्र आता त्याच पैठणमधील काँग्रेसच्या करकोट सारख्या महत्त्वाच्या नेत्याने सेनेत प्रवेश केल्याने भूमरेंना याचा फायदा नक्कीच होणार आहे.अब्दुल सत्तार यांचा पैठणमध्ये मानणारा मोठा वर्ग आहे. सत्तार मंत्री असताना पैठणमध्ये त्यांनी अनेकांना पक्षात घेऊन संधी देण्याचा काम केलं होत. तसेच करकोटक यांची पैठण शहर भागात चांगली पकड आहे. मात्र आता ते सुद्धा सत्तार यांच्यासोबत शिवसेनेत आल्याने विधानसभा निवडणुकीत पैठणचे शिवसेनचे विद्यामान आमदार संदीपान भुमरे यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळेच सत्तार आणि करकोटक यांच्या सेनाप्रवेशाने भुमरेंच्या गटात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.