मुंबई – काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके सध्या पक्षापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच संपर्कात अधिक असल्यांचं समोर आलं आहे. भालके यांनी अद्याप भाजपमध्ये प्रवेश घेतला नसला तरी ते मनाने पूर्णपणे भाजपवासी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळात देखील भालके गैरहजर होते. त्यामुळे भालके यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा सुरू झाली.
आषाढी एकदाशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार भारत भालके यांच्या घरी भेट दिली होती. तेव्हापासून भालके भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतरही त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच भालके भाजपच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यातच त्यांनी मागील अनेक दिवसातं काँग्रेसच्या कार्यक्रमांना हजेरी लावली नाही. त्यामुळे भालके यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. परंतु, राज्यातील पूरस्थितीमुळे त्यांचा पक्षप्रवेश रखडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कार्यभार हाती घेतल्यापासूनच भालके काँग्रेसमध्ये फारसे सक्रिय दिसलेच नाहीत. त्यात भालके आणि थोरात यांची सह्याद्री अतिथीगृहावर अचानक भेट झाली. यावेळी थोरात यांनी भालके यांची विचारपूस करत तुम्ही आहात कुठं, असा प्रश्न केला. अचानक आलेल्या बाउन्सरवर भालके स्तब्ध झाले. मुख्यमंत्र्यांकडे वैयक्तीक काम होते, असं सांगत भालके यांनी वेळ मारून नेली.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नुकतीच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्रीवर भेट घेतली. यावेळी काँग्रेसनेते थोरात आणि भारत भालके समोरासमोर आले. यावेळी न राहून थोरात यांनी भालकेंना तुम्ही कुठेही दिसत नसल्याचे म्हटले.
आमदार भारत भालके यांना पक्षात घेतल्यास पंढरपूर मतदार संघ सहज जिंकता येईल, असाच काहीसा अंदाज भाजपमध्ये आहे. परंतु, पूरस्थितीमुळे भाजपकडून सध्या पक्षप्रवेश स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे भालके वेटींगवर असल्याचे समजते.