Congress Hiraman Khoskar News: विधान परिषदेला पहिले मतदान कुठे करायचे, दुसरे कुठे करायचे आणि तिसरे कुठे करायचे, या पद्धतीने आम्हाला सांगितले होते. पक्षाने सांगितल्याप्रमाणेच आम्ही मतदान केले. त्यांना आमच्यावर विश्वास नसेल तर न्यायालयाची परवानगी काढून झालेले मतदान तपासून घ्यावे. माझी चूक झाली असेल, तर कारवाई करावी, पक्षातून हकालपट्टी करावी. परंतु, कारण नसताना महाराष्ट्रभर बदनामी सुरू आहे, ती थांबवा, असे काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
विधान परिषदेत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे समोर आले. त्यानंतर क्रॉस व्होटिंग कोणी केले, त्यांची नावे समोर आली असून, पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय आहे. यासंदर्भात मीडियाशी बोलताना हिरामण खोसकरांनी अगदी स्पष्टपणे आपली भूमिका स्पष्ट केली.
आम्ही चुका केल्या नाहीत
नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीआधी एक दिवस हॉटेलमध्ये आमची सर्वांची चर्चा झाली होती. यावेळी कोणाला मतदान द्यायचे? हे ठरले. आम्हाला सात जणांना पहिली पसंती मिलिंद नार्वेकर, दुसरी पसंती शेकापचे जयंत पाटील आणि तिसरी पसंती प्रज्ञा सातव, या पद्धतीने मतदान करण्यास सांगितले होते, त्याच पद्धतीने आम्ही केले. आम्ही चुका केल्या नाहीत, असे खोसकरांनी स्पष्ट केले.
नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्याने अनेक नाराज
नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज आहेत. आता लहान तोंडी मोठा घास माझ्या सारख्या लहान कार्यकर्त्यांनी घेऊ नये. मात्र, बरेच आमदार नाराज आहेत. मी गरिब माणूस आहे. आम्ही सन्मानाने राहतो. पाच वर्षात आम्ही कुठेही काही बोललो नाहीत. पक्षश्रेष्ठींनी गेल्या पाच वर्षांत एकाही आमदाराला विचारले नाही. आमचे काम होतात की नाही होत, याबाबत विचारले पाहिजे. नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष आहेत. आमची अपेक्षा आहे की त्यांनी दोन महिन्यांमधून एखाद्या दिवस तरी विचारले पाहिजे. विकासाच्या बाबातीत बोलले पाहिजे. त्यांना भेटले की फक्त तुम्ही असे केले, तसे केले असेच बोलतात. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कधीही ते आमदारांना प्रेमाने बोलले नाहीत. याबाबत वरिष्ठांकडे काही आमदारांनी तक्रार केली आहे, असे खोसकरांनी म्हटले आहे.
दरम्यान, कोण उमेदवार द्यायचे याबाबत पक्षाला अधिकार आहेत. मात्र, तुम्हाला उमेदवारी द्यायची नसेल तर देऊ नका. पण बदनामी करु नका. मी अजूनही पक्षाबरोबर आहे. पण पक्षाने तिकीट दिले नाही तर मला काही कार्यकर्ते शांत बसू देणार नाही. मग काहीतरी भूमिका घ्यावी लागेल. काय भूमिका घ्यायची ते कार्यकर्ते ठरवतील मी ठरवणार नाही, असे हिरामण खोसकरांनी स्पष्ट केले.