…तर आमदारकीचा राजीनामा देईन; ‘मविआ’ सरकारवर काँग्रेस आमदाराची जाहीर नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 07:02 PM2022-04-08T19:02:34+5:302022-04-08T19:03:25+5:30
महाविकास आघाडीत एका काँग्रेस आमदाराची खदखद बाहेर आली आहे. काँग्रेसच्या आमदाराने स्वत:च्या महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
मुंबई – राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. मात्र काही ना काही कारणांवरून मविआत धुसफूस असल्याचं समोर येते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री पद असलेल्या शिवसेनेच्या आमदारांनीच उद्धव ठाकरेंची भेट घेत अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकण्याची भाषा करत नाराजी व्यक्त केली. सरकारमध्ये निधी वाटपावरून काँग्रेस-शिवसेनेचे आमदार सातत्याने नाराजी करत आहेत. त्यातच एका काँग्रेस आमदाराने आता राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.
महाविकास आघाडीत एका काँग्रेस आमदाराची खदखद बाहेर आली आहे. काँग्रेसच्या आमदाराने स्वत:च्या महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. आदिवासींची कामे होणार नसतील तर राजीनामा देऊन टाकील. राज्यातील आदिवासी विभागाची कामचं होत नसतील तर आमदारकीचा उपयोग काय असा सवाल करत काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.
आमदार हिरामण खोसकर म्हणाले की, आदिवासी विकास भवन येथे पोषण आहार आणि गणवेशासह इतर सुविधांचा अभाव असल्यानं शाळकरी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी आंदोलन केलंय. राज्यातील आदिवासी आश्रम शाळेच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरत महिनाभरात कारवाई झाली नाहीतर प्रधान सचिव आणि आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी करेल असं विधान केले आहे.
अलीकडेच काँग्रेसच्या १८ आमदारांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे व संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली. या भेटीत आमदारांनी आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यावर राहुल गांधी हेच कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील आमदारांशी भेटीसाठी इच्छुक आहेत, लवकरच ते आमदारांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांचे म्हणणे एकूण घेणार असल्याचे वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या आमदारांना मिळत असलेल्या एकूणच वागणुकीबद्दल आमदारांनी नाराजी व्यक्त केली.
का आहेत काँग्रेस आमदार नाराज?
बडे नेते मंत्रिपदात खूश आहेत. आमदारांकडे कुणाचेच लक्ष नाही. महामंडळांवर आमदारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. राष्ट्रवादी व शिवसेनेची अडचण असेल, तर किमान काँग्रेसच्या कोट्यात येणारी महामंडळे जाहीर करावी, अशी मागणी आमदारांनी केली. निधीचे सम प्रमाणात वाटप करावे व विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा निकाली काढावा, अशी मागणी काँग्रेस आमदारांची आहे.