नवऱ्यामुळे मुलीला HIV, Ex बॉयफ्रेंडने शेवटपर्यंत केली सेवा; काँग्रेस आमदारालाही आले गहिवरून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 04:58 PM2024-10-21T16:58:03+5:302024-10-21T16:58:37+5:30
कैलास गोरंट्याल यांनी या मुलाखतीत जालन्यातील एका प्रियकराची कहाणी सांगितली. HIV झालेल्या प्रेयसीची सेवा करणारा प्रियकर त्यांच्याकडे मदतीसाठी आला होता. अंगावर काटा आणणारा हा प्रसंग सांगताना गोरंट्याल यांनादेखील गहिवरुन आलं होतं.
सध्या राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसल्याचं दिसत आहे. विधनसभा निवडणुकीच्या तोंडावर जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी नुकतीच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील काही प्रसंग आणि किस्से शेअर केले.
कैलास गोरंट्याल यांनी सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राजकारणाबरोबरच इतर गोष्टींवरही भाष्य केलं. कैलास गोरंट्याल यांनी या मुलाखतीत जालन्यातील एका प्रियकराची कहाणी सांगितली. HIV झालेल्या प्रेयसीची सेवा करणारा प्रियकर त्यांच्याकडे मदतीसाठी आला होता. अंगावर काटा आणणारा हा प्रसंग सांगताना गोरंट्याल यांनादेखील गहिवरुन आलं होतं. ते म्हणाले, "एका मुलाचं मुलीसोबत अफेअर होतं. पण, मुलीच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून दिलं. पण, दुर्देव म्हणजे ज्याच्याशी लग्न लावून दिलं त्या मुलाला एड्स हा आजार होता. त्यामुळे मग मुलीलाही तो आजार झाला. लग्नानंतर तो मुलगा वारला. मग तिच्या सासरच्या लोकांनी तिला बघणं सोडून दिलं. त्यानंतर ती मुलगी जालन्यात आली".
"मुलीची आई तिची काळजी घ्यायची. त्या मुलीचा एक्स बॉयफ्रेंड नंतर तिची काळजी घेत होता. ती मरेपर्यंत त्याने तिची सेवा केली. माझ्याकडे एकदा तो मदतीसाठी आला होता. माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण प्रसंग हा होता. ती मरणाच्या दारात असतानाही एक्स बॉयफ्रेंडने तिची सेवा केली. प्रेम काय असतं हे यातून दिसतं. मला वाटतं याच्यावर सिनेमा काढायला हवा. माझ्या अंगावर अजूनही काटा येतो", असंही ते पुढे म्हणाले.
दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. भाजपाने त्यांची पहिली यादी जाहीर केली असून आता महायुतीतील इतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी यादीकडे लक्ष लागून राहिलं आहे. तर महाविकास आघाडीत अद्यापही जागा वाटपावरुन एकमत होत नसल्याचं दिसत आहे. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून २६ नोव्हेंबरपर्यंत राजकीय पक्षांना सरकार स्थापन करावे लागणार आहे.