मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. त्यात नुकतेच राहुल गांधींच्या नेतृत्वात मुंबईत इंडिया आघाडीची सभा पार पडली. या सभेच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे आमदार राजू पारवे हे पक्षाला रामराम करून शिंदेंच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेण्यासाठी सज्ज झालेत अशी बातमी समोर आली आहे. उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. आज हा पक्षप्रवेश होऊ शकतो.
राजू पारवे हे शिवसेनेचे रामटेकचे उमेदवार असतील का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी पारवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मागच्या अनेक दिवसांपासून पारवे हे रामटेकमध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार असतील असं बोललं जात होते. परंतु महायुतीत ते भाजपा चिन्हावर लढणार की शिवसेनेच्या यावर प्रश्नचिन्ह होते.एकनाथ शिंदे यांनी रामटेकची जागा सोडण्यास नकार दिला होता. त्यामुळे महायुतीत मोठा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे राजू पारवे यांना शिवसेनेत प्रवेश देत महायुतीतून त्यांना उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
राजू पारवे हे काँग्रेसचे उमरेडचे आमदार आहे. मात्र रामटेक मतदारसंघात अनेक भागात त्यांचे प्राबल्य आहे. रामटेक हा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी आरक्षित आहे. त्यामुळे राजू पारवे हे या भागात तगडे उमेदवार ठरू शकतात असा महायुतीला अंदाज आहे. अशी बातमी ABP माझानं दिली आहे. राजू पारवे हे काँग्रेसचे आमदार असले तरी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. राजू पारवे यांना सोबत घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी खूप प्रयत्न केले. त्यामुळे अखेर आज पारवे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून रामटेकमधून निवडणुकीला उभे राहणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, या पक्षप्रवेशाबाबत राजू पारवे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.