मुंबई: महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) बेबनाव, नाराजी आता मोठ्या प्रमाणात चव्हाट्यावर येत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकच्या निधीवाटपानंतर शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमधील नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी एका सभेला संबोधित करताना शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असल्याची खदखद बोलून दाखवली होती. शिवसेनेनंतर आता काँग्रेस आमदार आपल्याच मंत्र्यांवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. नाराज असलेल्यांची संख्या २५ च्या जवळपास असून, काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या भेटीची वेळ मागितली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सत्तेची फळे चाखता येत आहेत. पण शिवसेनेलाच लाचारासारखी वागणूक मिळत आहे. गेल्या अडीच वर्षात केवळ अपमानच होत असेल, तर साहेब विचार करायला हवा, अशी खदखद शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी अलीकडेच व्यक्त केली. यानंतर आता शिवसेना सत्तेचा मोह सोडून महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तानाजी सावंत यांनी बोलून दाखवलेल्या नाराजीला अवघे काही दिवस उलटले असताना आता काँग्रेसमध्येही धुसपूस असल्याचे समोर आले आहे.
नाराज आमदार सोनिया गांधींची घेणार भेट
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेनंतर आता काँग्रेस पक्षामधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. काँग्रेसचे काही आमदार नाराज असल्याचे बोललं जात असून यासंदर्भात थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीच भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी सोनिया गांधी यांच्याकडे भेटीची वेळही मागितली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे मंत्री असूनही त्यांच्याकडून कामे लवकर होत नसल्याबाबत आमदारांमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ही आमदार मंडळी दिल्लीला एका प्रशिक्षणासाठी जाणार असून तेव्हाच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, सत्ता स्थापन झाल्यानंतर काही महिन्यांतच बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांमध्ये बोलताना ही नाराजी बोलून दाखवली होती. यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आतातरी महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम राबवावा, अशी मागणी केल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिल्याची माहिती मिळाली आहे.