मुंबई: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्षही आणखी तीव्र होताना दिसत आहेत. यातच आता शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले आहे. यानंतर काँग्रेसने आता बंडखोरांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरे यांना समजू शकला नाहीत, तर तुम्ही कसले शिवसैनिक आहात, या शब्दांत हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडीतील मंत्र्यांची उपस्थिती होती. महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार पडणार की तरणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. यातच उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना लिहिलेल्या पत्राबाबत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना विचारण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली.
तुम्ही उद्धव ठाकरे यांचा समजू शकलेला नाहीत
राजकारणात अशक्य असे काहीच नसते. उद्धव ठाकरे कुटुंब प्रमुख आहेत. बंडखोरांना भावनिक साद घालणे साहजिकच आहे. मात्र, आम्ही शिवसेनेत नसतानाही उद्धव ठाकरे यांना समजून घेऊ शकलो. उद्धव ठाकरे यांची तब्येत बरी नाही. त्यांचे मोठे ऑपरेशन झाले आहेत. तर मग ज्यांनी तुम्हा राजकारणात जन्माला घातले, पुढे आणले, त्यांना कसे तुम्ही समजू शकला नाहीत आणि असे असेल तर तुम्ही शिवसैनिक कसले शिवसैनिक, अशी विचारणा यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
दरम्यान, आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे , आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू, असे एक पत्र उद्धव ठाकरे यांनी लिहिले आहे.