"उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, आम्ही तुमच्यासोबत"; यशोमती ठाकूर यांचे मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 02:58 PM2024-10-21T14:58:26+5:302024-10-21T15:01:23+5:30
उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असं विधान काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.
Maharashtra Assembly Elections : काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्यावरुन महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते एकमेकांना आव्हान देत आहेत. मविआ आणि महायुती मुख्यमंत्रीपदाचे नावे जाहीर करण्यास टाळाटाळ करत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानांमुळे मविआच्या नेत्यांमध्ये खदखद सुरु असल्याचे पाहायला मिळाले. मात्र उद्धव ठाकरेंनीही मविआने जाहीर केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याला माझा पाठिंबा असेल असं म्हणत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी मोठं विधान केलं आहे. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
रविवारी अमरावतीमध्ये महाविकास युवा आघाडीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना यशोमती ठाकूर यांनी हे विधान केलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचे म्हटलं होतं.आधी सत्ताधारी महायुतीने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, त्यानंतर महाविकास आघाडी आपला चेहरा जाहीर करेल, असे स्पष्टीकरण दिले होत. त्यानंतर आता यशोमती ठाकूर यांनी पुढच्या काळात त्यांनीच मुख्यमंत्रीपद ठिकाणी विराजमान व्हावं, असं म्हटलं आहे.
"प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपले गांव-आपला बूथ सक्षमपणे सांभाळावा. विजय आपलाच असला तरी ही लढाई मोठी असल्याने कुणीही गाफील राहू नये. देश विघातकी शक्तीच्या विरोधात पुन्हा पेटून उठण्याची वेळ आली आहे. विरोधक विधानसभा निवडणुकीत नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी लाखों खर्च करून मोठं-मोठे होर्डिंग लावून सरकारचे गोडवे गात असले तरी निवडणूक जिंकण्यासाठी भाजप मित्र पक्षांकडून उधळल्या जात असलेला हा पैसा जनतेच्या घामाचा पैसा आहे. याची जाणीव त्यांना करून देण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी सर्व भेद विसरून एकजुटीने काम करावे, असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले.
"जो ५० कोटी घेऊन स्वतःच्या बापाच्या पाठीत खंजीर खुपसतो तो जनतेचा काय होणार. आताच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं. उद्धव ठाकरेंनी का नाही मुख्यमंत्री व्हायला हवं. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव मुख्यमंत्री झाले. ते तुम्हाला सहन नाही झालं तर काय होणार. माझ्या मनातली इच्छा सांगते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची पाच वर्षे पूर्ण करायला हवी होती. माझं वैयक्तिक मत आहे की, पुढच्या काळात त्यांनीच त्या ठिकाणी विराजमान व्हावं. आम्ही तुमच्या सोबत आहोत," असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.