संजय राऊत बोलण्याला लगाम घालतील; सावरकरांबद्दलच्या 'त्या' विधानावर काँग्रेस नाराज?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 08:23 PM2020-01-19T20:23:54+5:302020-01-19T20:26:56+5:30
सावरकरांबद्दलच्या विधानाबद्दल काँग्रेसकडून अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त
सोलापूर: सावरकरांवरुन पुन्हा एकदा महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानात पाठवा, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच केलं होतं. या पार्श्वभूमीवर भाष्य करताना काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी शिवसेनेबद्दल अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. संजय राऊत अंदमानला जाऊन आलेत की नाही, याबद्दल मला माहीत नाही. पण ते बोलण्याला लगाम घालतील असं मी समजतो, असं दलवाई सोलापूरमध्ये म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशातल्या काँग्रेस सेवादलानं एक पुस्तिका प्रसिद्ध केली होती. त्यात सावरकरांबद्दल करण्यात आलेल्या लेखनानं वाद निर्माण झाला होता. मात्र काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी सावरकरांच्या कार्याचं कौतुक केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी मोठा त्याग केला आहे. त्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेलं योगदान विसरता येणार नाही, असं दलवाई म्हणाले. सावरकरांनी माफीचं पत्र लिहिलं असं काही जण म्हणतात. मात्र मला या प्रकरणात कोणताही वाद निर्माण करायचा नाही, अशा शब्दांत दलवाईंनी त्यांची भूमिका मांडली.
मुस्लिमांना राज्यातल्या सत्तेत वाटा मिळायला हवा, असं दलवाई म्हणाले. मुस्लिमांना सत्तेत सामावून घ्यायला हवं. महाराष्ट्रातला मुसलमान हा खऱ्या अर्थानं इथल्या मातीतला मुसलमान आहे. तो कधीच हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याची भाषा करत नाही. कोणी तरी हैदराबादवरुन शेरवानी घालून येतो आणि इथं गडबड करतो हे आम्हाला मान्य नाही. हे कुठेतरी थांबवायला हवं, अशा शब्दांत त्यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर नाव न घेता टीका केली.