Congress MP Kumar Ketkar News: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आता जय्यत तयारीला सुरुवात केल्याचे दिसत आहे. बैठका, दौरे, सभा यांचे प्रमाण वाढत असून, जागावाटप आणि उमेदवारीविषयी चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीने भाजपविरोधात कंबर कसली असून, भाजपही इंडिया आघाडीला उत्तर देण्याची सज्जता करत आहे. यातच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपला पुन्हा बहुमत मिळणार नाही. तरीही ते सत्ता सोडणार नाहीत. सत्तांतरासाठी राजकीय संघर्ष अटळ आहे, असा मोठा दावा काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी केला आहे.
मीडियाशी बोलताना कुमार केतकर यांनी लोकसभानिवडणूक निकालांबाबत मोठे भाकित केले. भाजपला बहुमत मिळणार नाही, असे सांगताना, दुसऱ्या कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, असे कुमार केतकर म्हणाले. काँग्रेस हा स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार नाही. काँग्रेस इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहे. तसेच इंडिया आघाडीचा घटक म्हणून निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जागा निश्चितच वाढतील, असा विश्वास कुमार केतकरांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळणार नाही
विरोधी पक्षाच्या सदस्यांना ‘टार्गेट’ केले जात आहे. ही लोकशाहीची नव्हे तर हुकमशाहीची लक्षणे आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळणार नाही. हा पक्ष २१५ ते २२० जागांपर्यंत जाईल. त्यानंतरही नरेंद्र मोदी राजीनामा देणार नाहीत. सत्ता सोडणार नसल्याने लोकसभा निवडणुकीनंतर देशात राजकीय संघर्ष अटळ आहे, असे सूतोवाच कुमार केतकर यांनी केले.
तिन्ही पक्षात प्रत्येकी १६ जागांचे विभाजन होईल
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तीन पक्ष इंडिया आघाडीचे घटक म्हणून निवडणूक लढतील. तिन्ही पक्षात प्रत्येकी १६ जागांचे विभाजन होईल, असे कुमार केतकर यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाबाबत बोलताना, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी नव्हे तर प्रवक्त्यांनी पत्र लिहिले आहे. त्यांनी स्वतः सोनिया गांधी किंवा मल्लीकार्जुन खर्गे यांना पत्र लिहायला हवे. काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांना कोणताही विरोध नाही. असे असते तर ते यापूर्वी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले नसते, असे कुमार केतकरांनी स्पष्ट केले.