Congress MP Praniti Shinde: मालवण सिंधुदुर्गातील राजकोट परिसरात आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला आणि अवघा महाराष्ट्र हळहळला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. ठाकरे गटासह महाविकास आघाडीचे नेते मालवण येथे पाहणी करायला गेले होते. तेव्हा तिथे नारायण राणेही आले. यामुळे ठाकरे गट आणि राणे समर्थक यांमध्ये जोरदार राडा झाला. यावरून आता काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने निषेध व्यक्त केला. यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, आपल्या राज्यात परवा जे घडले ते महाराष्ट्रासाठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट होती. फक्त चरणच दिसत होते, अशा पद्धतीचे फोटो व्हायरल झाले. हे दृश्य अनेक जणांना बघवले नाही. अंगावर शहारा येत होता. महाराजांची मूर्ती ही एक जरी प्रतिमा जरी असली तरी त्या मागील या सरकारच्या भावना लक्षात येतात. पुतळ्याची विटंबना करण्यात आली. तो पुतळा कमकुवत होता, ज्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिले ते केवळ तुमच्या मुलाला खुश करण्यासाठी देण्यात आले. पंतप्रधानांना खुश करण्यासाठी तुम्ही त्यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण केले, या शब्दांत प्रणिती शिंदे यांनी निशाणा साधला.
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार नाही
नुसते शो बाजी करणारे सरकार आहे. आतून अतिशय पोकळ असे हे सरकार आहे. आतून पोकळ असणारा पुतळा तयार केला. अरबी समुद्रात मागच्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे प्रस्तावित आहे. पण हे सरकार तो पुतळा करणार नाही. मात्र, जो पुतळा आहे, त्याची अशा पद्धतीने विटंबना करता. हवेमुळे पुतळा पडला असे वक्तव्य जर मुख्यमंत्र्यांकडून होत असेल तर जनतेने कोणाकडे पाहायचे, अशी विचारणा प्रणिती शिंदे यांनी केली.
जे लोकसभेला चित्र दिसले तेच आता विधानसभेत दिसणार आहे
बदलपूरच्या घटनेमागे हेच लोक राजकारण करत आहे. पुतळा पडण्यामागे हवेचे कारण त्यांच्याकडून दिले जात आहे. या पद्धतीच त्यांचे बोलणे असेल तर एकंदरीत हे दिसून येत की, त्यांची उलटी गिनती सुरु झाली आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरे यांच्याकडे नाहीत. ते अगोदर आतमधून, अनऑफिशिअली पैसे द्यायचे आता ऑफिशिअली देत आहेत. म्हणून ते आणखी एक महिना मागत आहेत. निवडणुका जाहीर करत नाहीत. महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत. राज्याच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. कारण अजून त्यांना पैसे वाटप करायचे आहेत. आता रस्त्यावर उतरून पेटून उठायची गरज आहे. जे लोकसभेला चित्र दिसले तेच विधानसभेत दिसणार आहे, असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला.