भावनगर - काँग्रेस खासदार राहुल गांधी जे काही करतायेत. त्याबाबत कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी केले तर ठीक. पण कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन काय करत असतील तर त्याच्यावर आम्हाला कारवाई करावी लागेल. आम्ही भारत जोडो यात्रेला सुरक्षा पुरवली आहे. त्यांची यात्रा सुरक्षित राज्याबाहेर पाठवू. परंतु महाराष्ट्रातील वातावरण त्यांना बिघडवू नये असा सूचक इशाराही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. गुजरातच्या भावनगर येथे फडणवीस निवडणूक प्रचाराला गेले होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काढलेली यात्रा ही भारत जोडो यात्रा नव्हे तर मोदी विरोधी जोडो यात्रा आहे. कारण काँग्रेसला लक्षात आलं भारताची जनता मोदीशी जोडलेली आहे. त्यामुळे अस्तित्व टिकवायचं असेल देशभरात मोदींच्या विरोधकांना जोडायला हवं. अन्यथा देशात काँग्रेस विसर्जित होईल. त्यासाठी राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर निघालेत अशा शब्दात फडणवीस यांनी टीका केली आहे.
तसेच भाजपाबद्दल लोकांच्या मनात सकारात्मक भावना आहे. राहुल गांधी यांच्यासारख्या लोकांवर कारवाई करण्याचा फायदा नसतो. अनेक केसेस त्यांच्यावर यापूर्वीही झाल्यात. ते जामीनावरच बाहेर आहेत. अनेकदा कोर्टात हजर राहत नाही म्हणून वॉरंट निघतात. ते जे खोटे बोलतायेत त्यावर आम्ही उत्तर देऊ. सुरुवातीला माध्यमांचे लक्ष भारत जोडो यात्रेला मिळत नव्हतं. त्यामुळे माध्यमांचे लक्ष जावं यासाठी अशाप्रकारे वादग्रस्त विधान करतायेत असं फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रातील लोकांमध्ये नाराजी आहे. १३ वर्ष ज्यांनी काळापाणी, तुरुंगाची शिक्षा भोगली. त्यांच्याबद्दल ज्यांनी कधी जेल पाहिली नाही अशांनी बोलावं. त्यामुळे निश्चित लोकांमध्ये राहुल गांधींच्या विधानाबाबत संताप आहे. दरवेळेस राहुल गांधी सावरकरांबाबत वाटेल ते बोलतात. त्यानंतर शिवसेनेचे नेते बोलतात. सावरकरांसाठी ते सत्ता कधीच सोडू शकत नाही असा समाचार देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांचा घेतला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"