"रस्यावर उतरून लोकांचा आवाज ऐका, मग कळेल द्वेष, हिंसा, भीती कुठे आहे?"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 11:47 PM2022-11-18T23:47:54+5:302022-11-18T23:49:39+5:30
शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, त्याला आधाराची गरज आहे. पाऊस, अतिवृष्टी, चक्रीवादळ यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते पण त्यांना भाजपा सरकार मदत करत नाही असं राहुल गांधी म्हणाले.
शेगाव - कन्याकुमारीपासून ही पदयात्रा सुरू झाली असून जनतेचे ऐकून घेत आम्ही पुढे जात आहोत. मी तुमचे दुःख ऐकण्यासाठी आलो आहे. पण काही लोक हिंसा, द्वेष, भीती पसरवण्याचं काम करत आहेत. भीती, हिंसा, द्वेष यामुळे नुकसान होते, प्रेम, बंधुभाव, अहिंसा याने लोक एकजूट होतात. विरोधक विचारात की देशात कुठे आहे हिंसा, भीती, द्वेष? असा प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांनी जर रस्यावर उतरून लोकांचा आवाज ऐकला तर कळेल की द्वेष, हिंसा, भिती कुठे आहे असा घणाघात काँग्रेस खासदार राहुल गांधींनी केला. शेगाव येथे भारत जोडो यात्रेची सभा पार पडली. याठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
राहुल गांधी म्हणाले की, मागील आठ वर्षात देशात सामाजिक विषमता वाढीस लागली आहे. शेतकरी प्रचंड संकटात आहे, तरुण वर्ग नोकरीच्या शोधात आहेत पण त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यांच्या समस्या कोणी ऐकत नाही. मुलांच्या शिक्षणावर पालकांना लाखो रुपये खर्च करावे लागतात. मुले इंजिनिअरींगचे शिक्षण घेतात आणि त्यांना एखादी खाजगी टॅक्सी चालवावी लागते किंवा किरकोळ काम करावे लागते. पालकांनी यासाठी एवढा खर्च केला का ? तरूण, शेतकरी उघड्यावर आहेत आणि दुसरीकडे याच हिंदुस्थानात काही मुठभर लोकच श्रीमंत होतात, असा हिंदुस्थान नको आहे आणि आम्ही तो होऊ देणार नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच द्वेष व हिंसेने देशाचा फायदा होत नाही. महाराष्ट्र भूमी ही साधु, संत, महापुरुषांची भूमी आहे. यांनी लोकांना प्रेम दिले, लोकांना जोडण्याचे काम केले आम्हीही तेच करत आहोत. आम्ही देश जोडण्याचे काम करत आहोत. ज्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात हिंसा अनुभवली आहे ते द्वेष पसरवत नाहीत. शेतकरी, कामगार यांच्या मनात द्वेष असूच शकत नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी. शिवाजी महाराज व आपण यांच्यात खूप फरक आहे, ते महान होते, ते महाराष्ट्राचा आवाज होते. शिवाजी महाराज यांना त्यांच्या आई जिजाऊ यांनी मार्ग दाखवला त्या मार्गाने ते गेले म्हणून ते छत्रपती बनले असं राहुल गांधींनी म्हटलं.
फायर है 🔥 pic.twitter.com/TGWU7eqhPC
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 18, 2022
...तर एकही आत्महत्या होणार नाही
शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, त्याला आधाराची गरज आहे. पाऊस, अतिवृष्टी, चक्रीवादळ यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते पण त्यांना भाजपा सरकार मदत करत नाही. नुकसान भरपाई देत नाही. पीकविमाही मिळत नाही. शेतकरी ५० हजार, एक लाख रुपयांचे कर्ज काढतात पण ते माफ होत नाही आणि मोठ्या उद्योगपतींचे लाखो करोडे रुपयांचे कर्ज माफ होते. शेतकरी संकटात सापडतो. त्रस्त होतो तेव्हा तो जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतो. विदर्भातील शेतक-यांचे कळताच युपीए सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी केली पण आजचे सरकार शेतकऱ्यांचा आवाज ऐकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व पंतप्रधान यांनी शेतकऱ्यांची पीडा, समस्या, दु:ख ऐकून घेतले तर एकही आत्महत्या होणार नाही असंही राहुल गांधी म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"