Balu Dhanorkar passes away: चंद्रपूरचे काँग्रेसखासदार बाळू धानोरकर यांचे वयाच्या 47व्या वर्षी निधन झाले. गुडगावमधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी 11 वाजता वरोरामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. धानोरकर यांना गेल्या काही दिवसांपासून पित्ताशय आणि स्वादुपिंडाचा त्रास होत होता. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली पण त्यांची प्रकृती चिंताजनकच होती आणि आज त्यांचे निधन झाले. ते काँग्रेसचेखासदार असले तरी सर्व पक्षात त्यांची मित्रमंडळी होती. भाजपाच्या दोन बड्या नेत्यांनी त्यांच्या निधनावर भावना व्यक्त केल्या. (Suresh Dhanorkar death)
भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले...
"चंद्रपूरचे तरुण खासदार आणि माझे जिवलग मित्र बाळू धानोरकर यांच्या अकस्मात निधनाने एक लढवय्या लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सतत जागरूक असणारे आणि प्रसंगी त्यासाठी आक्रमक होणारे धानोरकर हे असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान होते. हा तरुण लोकनेता आता आपल्यात नाही. हे दुःखद वास्तव स्वीकारायला मन अजूनही धजावत नाही. बाळू धानोरकर यांच्या अकाली जाण्याने मी माझ्या कुटुंबातील सदस्य गमावला आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना," असे ट्विट बावनकुळेंनी केले.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
"धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त दु:खद व धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. लोकहितासाठी आक्रमक भूमिका घेणारे अशी खासदार धानोरकर यांची ओळख होती. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तीनच दिवसांपूर्वी म्हणजे २७ मे रोजी खासदार धानोरकर यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. त्यानंतर आज धानोरकर यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या परिवारावर जो दु:खाचा डोंगर कोसळला आहे, त्यातून त्यांना सावरण्याची प्रार्थना माता महाकाली चरणी करतो", अशा शब्दात मुनगंटीवारांनी श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...
"चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चंद्रपूर जिल्ह्याने जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला एक नेता गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कठीण प्रसंगात आम्ही सारे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. ॐ शांति," असे फडणवीसांनी ट्विट केले.