Congress MP Vishal Patil News: लोकसभा निवडणुकीतनंतर ओबीसी आणि मराठा समाजातील नेते आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरले असून, काही झाले तरी कुणबी नोंदी रद्द होणार नाही. ओबीसीतूनच आरक्षण घेणार, यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे ठाम आहेत. यातच लोकसभेत महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारूनही अपक्ष लढून विजयी झालेल्या विशाल पाटील यांनी एक मोठे विधान केले आहे.
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर विशाल पाटील यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना विशाल पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आपण भाजपाचा पराभव करू शकतो, धनशक्तीचा पराभव करू शकतो. या जातीवादी लोकांचा पराभव करू शकतो हे सांगलीतून कळाले. लिंगायत, मराठा, धनगर समाजाने आपल्याला मतदान केले. या निवडणुकीत सांगली शहरातील मुस्लीम आणि इतर समाजातील लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केले. सांगलीमध्ये जैन समाज, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या मागण्या आणि अडचणींकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे त्यांनी आम्हाला मतदान केले, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी फडणवीसांनी फसवणूक केली
या शहरात मराठा समाजही मोठ्या प्रमाणात आहे. ज्याप्रमाणे मराठा समाजाला आणि मनोज जरांगे यांना त्रास दिला, ते मराठा समाजाला आवडलेले नाही. ज्याप्रमाणे वाईट वागणूक दिली. त्याचा बदला मराठा समाजाने घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे, अशी टीका विशाल पाटील यांनी केली. सांगलीतील प्रत्येक जण खासदार म्हणून निवडून आलेला आहे. आता तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात आपण संपर्क कार्यालय सुरू करणार आहोत, असे विशाल पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार येईल. आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचे चार ते पाच आमदार निवडून आणायचे आहेत. वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री या राज्यात पुन्हा एकदा झाला पाहिजे. सांगली जिल्ह्याचा माणूस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाला पाहिजे. यासाठी सगळ्यांनाच एक होऊन काम करावे लागेल, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे.