मोठी बातमी! काँग्रेस नेत्यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट; महाविकास आघाडीत नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 02:37 PM2021-09-23T14:37:36+5:302021-09-23T14:40:39+5:30
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
मुंबई – राज्यातील राजकारणात पुन्हा एक मोठी घडामोड घडली आहे. राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाने संजय उपाध्याय यांना संधी दिली आहे तर महाविकास आघाडीकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. परंतु त्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं विविध चर्चांना उधाण आलं आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी या चर्चेसाठी काँग्रेसच्या नेत्यांनी ही भेट घेतली. परंतु या भेटीमुळे महाविकास आघाडीतील इतर दोन पक्ष नाराज झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीच्या एकीवर काँग्रेसला विश्वास नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काँग्रेस नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानं शिवसेना-राष्ट्रवादीला हे रुचलं नाही.
राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं काँग्रेसला वाटतं म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. परंतु फडणवीसांनी काँग्रेससमोर आणखी एक प्रस्ताव ठेवला तो म्हणजे मागील अधिवेशनात भाजपाचे १२ आमदार निलंबित करण्यात आले आहेत. या आमदारांचे निलंबन रद्द करावं असा प्रस्ताव फडणवीसांनी काँग्रेसला दिला आहे. परंतु हा निर्णय महाविकास आघाडीचा आहे. काँग्रेस एकटी यावर निर्णय घेऊ शकणार नाही. परंतु फडणवीसांनी हा प्रस्ताव देऊन काँग्रेसची गोची केली आहे. तर काँग्रेसला महाविकास आघाडीच्या संख्याबळावर विश्वास नाही का? असं इतर पक्षातील नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत नाराजी पसरल्याची माहिती आहे.
काँग्रेस-भाजपामध्ये लढत
काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील आणि भाजपाचे संजय उपाध्याय यांनी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज भरले. ही निवडणूक ४ ऑक्टोबरला होणार आहे. महाविकास आघाडीकडे निर्भेळ बहुमत आहे आणि रजनी पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले पण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप व मित्रपक्षांचे बळ ११९ असून आणखी २०-२५ आमदार आमच्याकडे येऊ शकतात, असा दावा केल्यानं खळबळ माजली आहे.