“मराठवाड्यातील पूरस्थितीची गांभिर्याने दखल घेऊन तातडीने मदत पाठवा”: नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 04:43 PM2024-09-02T16:43:27+5:302024-09-02T16:43:57+5:30
Congress Nana Patole News: कापसला हेक्टरी ५० हजार, सोयाबीन हेक्टरी २५ हजार मदत मिळावी. सरकारने इव्हेंटबाजी व जाहिरातबाजी बाजूला ठेवून मराठवाड्यातील पूरग्रस्त लोकांना तातडीने मदत पोहोचवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Congress Nana Patole News: मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते व पुल वाहून गेल्याने मराठवाड्यातील अनेक गावांचा इतर भागाशी संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्याने शेतातील उभे पिक वाहून गेल्याने खरीप हंगामही वाया गेला. शेकडो जनावरे वाहून गेली आहेत. नद्या, नाल्यांना पूर आला आहे. सरकारने इव्हेंटबाजी व जाहिरातबाजी बाजूला ठेवून मराठवाड्यातील पूरग्रस्त लोकांना तातडीने मदत पोहचवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
मागील दोन दिवसापासून मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, धाराशीव, लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. हजारो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली, घरांची पडझडही झाली. मराठवाड्याला पुराने वेढले आहे. पुरग्रस्त लोकांना मदतीची नितांत गरज असून राज्य सरकारने याकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे. पूरग्रस्तांना सरकारी मदत तातडीने पोहचेल याची व्यवस्था करावी. जेथे गरज असेल तेथे एसडीआरएफ किंवा एनडीआरएफच्या तुकड्या पाठवा. नुकसानीच्या पंचनाम्याचे निर्देश द्यावेत पण त्याआधी तातडीची मदत जाहीर करून ती पूरग्रस्त व नुकसान झालेल्या लोकांपर्यंत पोहचण्याची व्यवस्था करावी, असे नाना पटोले म्हणाले.
अद्यापही पालकमंत्री जिल्ह्यांमध्ये पोहोचले नाहीत
पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांची सर्व व्यवस्था करावी. सर्व सरकारी यंत्रणा तातडीने कामाला लावून जनतेला आधार देण्यास व सर्व प्रकारची मदत पोहोचेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. हिंगोली शहरासह अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने परिस्थीती गंभीर बनली आहे. पूरग्रस्त भागातील लोकांना जास्तीत जास्त मदत पोहचवण्यासाठी सरकारने तातडीने आदेश द्यावेत. अद्यापही पालकमंत्री जिल्ह्यांमध्ये पोहोचले नाहीत. लाडका उद्योगपती व लाडक्या कंत्राटदारासाठी जसे सरकार जलतगतीने काम करते त्यापेक्षा जास्त गतीने पूरग्रस्त व शेतकऱ्यांना मदत द्या, असेही नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, मराठवाडा मध्ये जोरदार पाऊस झाला, मोठे नुकसान झाले आहे. तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला, सरकारने आता इव्हेंटमधून वेळ काढून शेतकऱ्यांना मदत करावी. कापसला हेक्टरी ५० हजार, सोयाबीन हेक्टरी २५ हजार मदत मिळावी. शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळाले पाहिजे. आता शेतकऱ्यांना मदत देताना हात आखडता घेऊ नये, असे आवाहन काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला केले.