Maharashtra Politics: “मोदी सरकार अदानींवरील चौकशीला का घाबरते? जनतेच्या पैशाचा हिशोब घेईपर्यंत शांत बसणार नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 08:00 PM2023-02-06T20:00:05+5:302023-02-06T20:01:26+5:30
Maharashtra Politics: LIC, SBIमधील पैसे लुटले. अदानीचा फुगा फुटेल असे राहुल गांधी यांनी सांगितले होते, असे सांगत मोदी सरकारवर टीका करण्यात आली.
Maharashtra Politics: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे ‘हम दो, हमारे दो’चे सरकार आहे असे काँग्रेस पक्ष सातत्याने सांगत होता ते खरे ठरले आहे. राहुल गांधी हे नेहमी अदानी व मोदी यांच्या घनिष्ठ संबंधावर बोलत होते. अदानीचा फुगा फुटेल असेही राहुल गांधी यांनी सांगितले होते. उद्योगपती मित्रांसाठी काम करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी करोडो जनतेचा कष्टाचा पैसा अदानीच्या कंपनीत बेकायदेशीर गुंतवला त्याचे परिणाम देशाला व गुंतवणुकदारांना भोगावे लागत आहेत. अब्जावधी रुपयांचा महाघोटाळा झाला असताना मोदी सरकार अदानीच्या चौकशीला का घाबरत आहे? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विचारला आहे.
एलआयसी कार्यालयाजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या प्रमुख उपस्थितीत निषेध आंदोलन केले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी मंत्री विश्वजित कदम, आ. संग्राम थोपटे, माजी आमदार उल्हास पवार, पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अदानीने एलआयसी, एसबीआयमधले पैसे लुटले
यावेळी पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वसामान्य जनतेचे पैसे मित्र अदानीला दिले, अदानीने एलआयसी, एसबीआयमधले पैसे लुटले. या संस्था लोकांच्या आर्थिक सुरक्षतेसाठी होत्या. मागील ८ वर्षात अदानी जागतिक पातळीवर थेट दुसऱ्या नंबरचा श्रीमंत व्यक्ती बनला. हिंडेनबर्ग अहवालातून अदानीचा खोटेपणा उघड झाला पण मोदी सरकार अदानीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व सरकारी संस्था मोदींच्या मित्रांच्या ताब्यात आहेत. हे सरकार लोकशाही माननारे असेल तर त्यांनी न्याय व्यवस्थेत अडचण आणू नये, असे नाना पटोले म्हणाले.
मोदींचे हुकुमशाही सरकार चर्चा करत नाही
काँग्रेससह इतर विरोधी पक्ष तीन दिवसांपासून संसदेत अदानी गैरकारभारावर चर्चा करण्याची मागणी करत आहेत पण मोदींचे हुकुमशाही सरकार चर्चा करत नाही. जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच त्यांच्या पाठिशी उभा राहिला आहे. आजही काँग्रेस पक्षाने जनतेचा पैसा सुरक्षित रहावा व अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करावी यासाठी राज्यभर आंदोलन केले. अदानीच्या गैरकारभाराची चौकशी होईपर्यंत व जनतेच्या एका-एका पैशाचा हिशोब घेतल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"