Pune Bypoll Election 2023: एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत असून, दुसरीकडे कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे. कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडी, भाजपचा जोरदार प्रसार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे अनेक नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठा दावा केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपची एकही जागा निवडून येणार नसून, महाराष्ट्र भाजपमुक्त होणार आहे, असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला.
भाजपचे नेते खासदार गिरीश बापट यांची काही दिवसांपूर्वीच भेट घेतली असून, त्यांची तब्येत ठीक नाही. गिरीश बापट यांना आरामाची गरज असताना भाजप नेत्यांनी त्यांना कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचाराकरीता उतरविले आहे. यातून भाजपा नेतृत्वाची मानसिकता दिसून येत आहे. तसेच अमित शाह यांना पुण्यात यावे लागले. यामधून भाजप नेतृत्वाच्या पायाखालची वाळू सरकल्याचे स्पष्ट होते, अशी टीका नाना पटोले यांनी केली. तसेच केंद्रीय यंत्रणा ताब्यात घेऊन भाजपने शिवसेनेचे धनुष्यबाण शिंदे गटाला दिले. पण आजवर देशात अशा घटना घडल्या. त्यानंतर त्या पक्षाला जनतेने नाकारले आहे. हेच एकनाथ शिंदे यांच्या बाबतीतदेखील घडणार, असा दावाही नाना पटोले यांनी केला.
मोदी आणि शहा निवडणुका आल्या की फिरत राहतात
नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघेजण निवडणुका आल्या की, फिरत राहतात. पण अन्य वेळी कुठेही दिसत नाहीत. दोन दिवसांपूर्वी अमित शाह यांनी पुण्यात विधान केल की, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या सर्व जागा येणार असल्याचा संकल्प केला आहे. पण देशातील आणि राज्यातील जनतेने मोदी आणि शहा यांना चांगलेच ओळखले आहे. नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीत भाजपाला नाकारले असून, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागणार, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपची एकही जागा निवडून येणार नसून, भाजपमुक्त महाराष्ट्र होणार आहे, असा मोठा दावा नाना पटोले यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"