“महायुती सरकारमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार; धनंजय मुंडेंवर कारवाई करा”: नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 16:47 IST2025-02-06T16:46:43+5:302025-02-06T16:47:00+5:30
Congress Nana Patole News: शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.

“महायुती सरकारमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार; धनंजय मुंडेंवर कारवाई करा”: नाना पटोले
Congress Nana Patole News: तत्कालीन एकनाथ शिंदे-भाजपा सरकारमधील भ्रष्टाचाराची मालिका संपत नाही. शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार करून खिसे भरण्याचा आणखी एक प्रकार शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या काळात झाला आहे. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग मंडळाच्या माध्यमातून कापूस साठवणूक बॅग खरेदीसाठी निविदा वेगळ्या शिर्षका खाली काढून ७७ कोटी रुपयांची खिरापत वाटून ४१.५९ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या नावाखाली विविध महामंडळाच्या माध्यमातून खरेदी आणि पुरवठ्यांच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून लूट केली आहे. काँग्रेस पक्ष महामंडळाच्या माध्यमातून सुरु असलेल्या या भ्रष्टाचाराविरोधात विधिमंडळात आवाज उठवणार असून सरकारने कारवाई केली नाही तर रस्त्यावरची लढाई लढून या भ्रष्टाचा-यांवर कारवाई करायला सरकारला भाग पाडू असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महायुती सरकारने भ्रष्टाचाराचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. कापूस साठवणूक पिशव्या खरेदीतही भ्रष्टाचार करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार करण्यात आला असून ७७.२५ कोटी रुपये यासाठी देण्यात आले. एकाच परिवारातील ४ वेगवेगळ्या कंपन्याना बेकायदेशीर रित्या निविदा काढून हे काम देण्यात आले. यंत्रमाग महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक तथा उप सचिव वस्त्रोद्योग श्रीकृष्ण पवार यांनी त्यांच्या मर्जीतील एका पुरवठादाराला माहिती देऊन त्यांच्या संगनमताने सर्व प्रक्रिया राबवून गैरव्यवहार करण्यात आला आहे. ही खरेदी प्रक्रिया लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना निवडणूक आयोगाची परवानगी न घेताच करण्यात आली. या कामा साठी चार कंपन्यांची निवड करण्यात आली त्यातील तीन कंपन्या ओसवाल या एकाच परिवारातील आहेत तर चौथी कंपनी ओसवाल यांच्या सनदी लेखापालाची आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.
४१ कोटी ५९ लाख ३५ हजार ५३६ रुपयांचा भ्रष्टाचार
यंत्रमाग महामंडळाने कापूस साठवणूक पिशव्या खरेदीसाठी प्रति पिशवी १२५० रुपयांचा दर मंजूर करण्यात आला. आयसीएआर नागपूर यांना याच पिशव्या ५७७ रुपये या दराप्रमाणे पुरवठा करण्यात आल्या आहे. म्हणजे प्रति पिशवी ६७३ रुपये जास्त दराने खरेदी करून एकूण ४१ कोटी ५९ लाख ३५ हजार ५३६ रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाने आयुक्तालयाकडून कापूस साठवणूक बॅग उत्पादनासाठी कच्चा माल खरेदी करण्यासाठी निधी अग्रीम स्वरुपात ७७.२५ कोटी रुपये महामंडळास अदा करुन घेतला. महामंडळ कापूस साठवणूक पिशवी उत्पादकाकडून विकत घेऊन पुरवठा करणार होते, यात कच्चा मालाच्या खरेदीचा प्रश्नच येत नसताना कच्चा माल पुरवठा करण्यासाठी या शीर्षकाखाली हा व्यवहार करण्यात आला, असेही नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे सरकारच्या काळात धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी साहित्य खरेदी आणि पुरवठ्याच्या डीबीटी योजनेत नियमबाह्य बदल करून मोठा गैरव्यवहार झाला आहे. या संदर्भात काँग्रेस पक्षाने सातत्याने सभागृहात व रस्त्यावर उतरून आवाज उठवला होता पण सरकारने काहीच कारवाई केली नाही. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही सर्व खरेदी तत्कालीन अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या परवानगीने आणि मान्यतेने झाली आहे असे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. त्यामुळे या घोटाळ्यात हे सर्वच सहभागी आहेत त्यामुळेच मुंडेंवर कारवाई करत नाहीत का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.
----००००----