“सर्वांना फसवले, मोदींची गॅरंटी खोटी, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार”; काँग्रेसला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 07:36 PM2024-02-24T19:36:57+5:302024-02-24T19:37:12+5:30

Congress Nana Patole News: देशातील परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपासाठी सर्व दारे बंद झाली आहेत, असा दावा करण्यात आला आहे.

congress nana patole claims india alliance govt will established in centre soon | “सर्वांना फसवले, मोदींची गॅरंटी खोटी, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार”; काँग्रेसला विश्वास

“सर्वांना फसवले, मोदींची गॅरंटी खोटी, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार”; काँग्रेसला विश्वास

Congress Nana Patole News: २०२४ हे वर्ष अत्याचारी व्यवस्थेपासून मुक्ती देणारे ठरणार आहे. दक्षिण भारतातून भाजपाला दारे बंद झाली आहेत, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष व केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाले आहेत. बिहारमध्ये राजद पक्ष आधीपासूनच इंडिया आघाडीत आहे. महाराष्ट्रात संविधानाची मोडतोड करुन खोके सरकार आणले आहे, हे जनतेला आवडलेला नाही. देशातील ही परिस्थिती पाहता नरेंद्र मोदींसाठी व भाजपासाठी सर्व दारे बंद झाली आहेत.  केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

पुणे शहर व जिल्हा काँग्रेसने आयोजित केलेल्या महाविकास आघाडी इंडिया फ्रंटच्या कार्यकर्ता मेळाव्यात नाना पटोले बोलत होते. पुण्यातूनही इंडिया आघाडीचाच खासदार निवडून येणार आहे, असे सांगताना, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १० वर्षात देशाचे नुकसान केले, मोदींनी दिलेली गॅरंटी ही खोटी ठरली आहे. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या, १५ लाख रुपये, महागाई कमी करणार व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार यासारख्या अनेक गॅरंटी मोदींनी दिल्या पण त्यातील एकही पूर्ण केली नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

या फसवणाऱ्या सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी दिली. परंतु यवतमाळच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी दिलेली कर्जमाफीची गॅरंटीही खोटी निघाली. मोदी सरकारने  शेतकरी, तरुण महिला अशा सर्वांना फसवले. या फसवणाऱ्या सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात येईल, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. या शहरात ड्रग्जचा काळा धंदा जोरात सुरु आहे. पुण्याची संस्कृती बिघडवण्याचे काम केले जात आहे. पुण्याला, महाराष्ट्राला ड्रग्जच्या विळख्यात अडकवू नका. पुण्यात विद्यार्थी त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन करत आहेत पण त्यांना आंदोलनाची परवानगी दिली जात नाही. ही हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही. या मुलांचा प्रश्न अधिवेशनात मांडून सरकारला जाब विचारु, असे नाना पटोले यांनी सांगितले.
 

Web Title: congress nana patole claims india alliance govt will established in centre soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.